हॅलो सामाजिक

संघर्षातून यशशिखराकडे झेप ; भडगावच्या महेश महाजन यांना सलग तिसऱ्यांदा ‘ग्रेट लीडरशिप अवॉर्ड’

भडगाव : प्रतिकूल परिस्थितीशी दोन हात करत जिद्द, मेहनत आणि नेतृत्वक्षमतेच्या बळावर यशाचे शिखर गाठणाऱ्या भडगावच्या सुपुत्र महेश भगवान महाजन यांना प्रतिष्ठेचा ‘ग्रेट लीडरशिप अवॉर्ड 2025’ प्रदान करण्यात आला आहे. विशेष म्हणजे हा मानाचा पुरस्कार त्यांना सलग तिसऱ्या वर्षी मिळाला असून त्यांच्या सातत्यपूर्ण उत्कृष्ट कार्याची ही मोठी दखल मानली जात आहे.

नाशिक येथे नुकत्याच भव्यदिव्य वातावरणात पार पडलेल्या पुरस्कार वितरण सोहळ्यात हजारो मान्यवर, अधिकारी, उद्योग क्षेत्रातील प्रतिनिधी आणि कर्मचारी उपस्थित होते. यावेळी कंपनीच्या सर्वोच्च नेतृत्वाकडून महेश महाजन यांना सन्मानचिन्ह, प्रशस्तीपत्र आणि ‘ग्रेट लीडरशिप अवॉर्ड’ प्रदान करण्यात आला. कंपनीच्या मालकांच्या हस्ते मिळालेला हा सन्मान त्यांच्या नेतृत्वगुणांची आणि कार्यक्षमतेची मोठी पावती मानली जात आहे.

महेश महाजन यांची यशोगाथा संघर्ष, जिद्द आणि आत्मविश्वासाचे प्रेरणादायी उदाहरण ठरत आहे. अत्यंत सामान्य आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल कुटुंबात जन्मलेल्या महेश यांचे वडील पानटपरी चालवून कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होते. मात्र कोरोना काळात वडिलांचे अकाली निधन झाल्याने संपूर्ण कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला. त्या वेळी मेकॅनिकल अभियांत्रिकीचे शिक्षण घेत असलेल्या महेश यांच्या खांद्यावर घराची सर्व जबाबदारी येऊन पडली.

अचानक आलेल्या संकटाने खचून न जाता त्यांनी धैर्याने परिस्थितीचा सामना केला. शिक्षणासोबत स्वतः पानटपरी सांभाळत कुटुंबाला आधार दिला. कठोर परिश्रम, चिकाटी आणि जिद्दीच्या जोरावर त्यांनी मेकॅनिकल इंजिनिअरिंगची पदवी यशस्वीरित्या पूर्ण केली.

पदवी संपादन केल्यानंतर एका नामांकित कंपनीत त्यांची निवड झाली. नोकरीदरम्यान दाखवलेले कौशल्य, समर्पण, प्रामाणिकपणा आणि प्रभावी नेतृत्व यामुळे त्यांनी अल्पावधीतच वरिष्ठांचा विश्वास संपादन केला. त्यांच्या उत्कृष्ट कामगिरीची दखल घेत कंपनीने त्यांना भारतासह चार वेगवेगळ्या देशांतील महत्त्वपूर्ण प्रकल्पांवर काम करण्याची संधी दिली. आंतरराष्ट्रीय स्तरावरही त्यांनी आपल्या गुणवत्तेचा ठसा उमटवत भडगावचे नाव उंचावले.

सलग तीन वर्षे ‘ग्रेट लीडरशिप अवॉर्ड’ मिळविण्याची कामगिरी ही त्यांच्या अथक परिश्रमांची, दूरदृष्टीची आणि नेतृत्वक्षमतेची साक्ष देणारी आहे. एका पानटपरीवाल्याच्या मुलाने संकटांवर मात करत जागतिक स्तरावर आपली वेगळी ओळख निर्माण केली, ही बाब भडगावकरांसाठी अभिमानाची ठरत आहे.

महेश महाजन यांच्या या उल्लेखनीय यशाबद्दल सर्व स्तरांतून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत असून ते आज भडगावच्या युवकांसाठी प्रेरणेचे दीपस्तंभ बनले आहेत. त्यांची यशोगाथा हेच सिद्ध करते की, परिस्थिती कितीही कठीण असली तरी जिद्द, मेहनत आणि आत्मविश्वास यांच्या जोरावर यशाची सर्वोच्च शिखरे सर करता येतात.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button