Pune Accident : पुणे जिल्ह्यात दोन भीषण अपघात, १२ जणांचा मृत्यू, अनेक जण जखमी

हॅलो जनता न्युज, जळगाव :
राज्यात आजचा शुक्रवार दुःखद अपघात ठरला आहे. पुण्याजवळ (Pune Accident) दोन गंभीर दुर्घटनांमध्ये १२ जणांचा मृत्यू झाला असून अनेक जण जखमी आहेत. पुणे नाशिक महामार्गावर नारायणगाव जवळ पहिला अपघात घडला असून त्यात नऊ जणांचा मृत्यू झाला आहे आणि काही जणांची प्रकृती गंभीर आहे. दुसरा अपघात आळंदी-पंढरपूर पालखी महामार्गावर घडला असून त्यात तिघांचा मृत्यू झाला आहे. यामुळे एकच खळबळ माजली आहे आणि अपघातातील मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
पुणे (Pune Accident) नाशिक महामार्गावर नारायणगाव जवळ आयशर टेम्पो, प्रवासी वाहतूक करणारी मॅक्झिमो गाडी आणि एसटी बस यांच्यात भीषण अपघात झाला. आयशर टेम्पो ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न करत असताना मॅक्झिमो गाडीला धडकला आणि त्यातून मॅक्झिमो गाडी एसटी बसला जाऊन धडकली. या अपघातात मॅक्झिमा गाडीचा चक्काचूर झाला आणि त्यामध्ये ११ प्रवासी गंभीर जखमी झाले, त्यातील सहा जागीच मृत झाले. चार जणांना गंभीर जखमांसह नारायणगावमधील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांची प्रकृती चिंताजनक आहे.
दुसरा अपघात आळंदी-पंढरपूर पालखी महामार्गावर जेजुरीजवळ बेलसर फाट्यावर घडला. येथे एसटी बस आणि दुचाकी यांच्यात टक्कर झाली. दुचाकीवरील तिघे जण जागीच ठार झाले. मृत व्यक्तींची नावे रमेश किसन मेमाणे (वय ६०), संतोष दत्तात्रय मेमाणे (वय ४०) आणि पांडुरंग दामोदर मेमाणे (वय ६५) अशी आहेत. ते तिघेही पारगाव मेमाणे, पुरंदर, पुणे येथील रहिवासी होते. मिळालेल्या माहितीनुसार, बेलसर फाटा येथे उड्डाण पुलाचे काम सुरू असताना दुचाकी चालक रस्ता क्रॉस करत असताना एसटी बसने त्यांना धडक दिली. एसटी चालकाने गाडीचा वेग कमी करण्याचा प्रयत्न केला तरी बस दुचाकीला फरफटत नेले आणि त्यात तिघेही जण मृत्युमुखी पडले.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या दुर्घटनांबद्दल दुःख व्यक्त करत मृतांच्या कुटुंबीयांना ५ लाख रुपये आर्थिक सहाय्य मुख्यमंत्री सहायता निधीतून देण्याची घोषणा केली आहे. तसेच जखमींवर योग्य उपचार होईल याची काळजी घेण्याचे निर्देश पुणे पोलिस अधीक्षकांना दिले आहेत.
Saif Ali Khan Attack : सैफ अली खानवर चाकू हल्ला, बॉलिवूडमध्ये धक्का