🛑 ब्रेकिंग: पाचोरा येथे आदिवासी समाजाचा आरक्षण बचाव जनआक्रोश मोर्चा

हॅलो जनता न्यूज, पाचोरा (प्रतिनिधी) –आदिवासी समाजाच्या हक्कांसाठी, तसेच आरक्षण व शासकीय योजनांच्या लाभासाठी एकलव्य आदिवासी संघटनेतर्फे आरक्षण बचाव जनआक्रोश मोर्चा पाचोरा येथे काढण्यात आला. संस्थापक अध्यक्ष सुधाकर वाघ व तालुका अध्यक्ष गणेश वाघ यांच्या नेतृत्वाखाली शहरातील एम. एम. कॉलेजपासून मोर्चाला सुरुवात झाली व प्रांताधिकारी कार्यालयावर धडक देत विविध मागण्यांचे निवेदन सादर करण्यात आले.
मोर्चात आदिवासी समाजबांधवांचा उत्स्फूर्त सहभाग दिसून आला. घोषणाबाजीसह मोठ्या संख्येने उपस्थित नागरिकांनी शासनाकडे आपल्या हक्कांचा लढा ठामपणे मांडला. तसेच मागण्या तत्काळ मान्य न केल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा देण्यात आला
पाचोरा मोर्चा : मोर्चातील प्रमुख मागण्या :
- आदिवासी समाजातील एस.टी. प्रवर्गात बंजारा, धनगर व इतर कोणत्याही जातीचा समावेश करण्यात येऊ नये.
- स्वातंत्र्यवीर क्रांतिकारक तंट्या भील यांचे स्मारक पाचोरा व भडगाव येथे उभारण्यात यावे.
- जोगनाय माता मत्स्य व्यवसाय सहकारी संस्था वेरुळी बु. (ता. पाचोरा) येथील चेअरमन व सचिव यांनी आदिवासी सभासदांची फसवणूक केल्याने त्यांच्यावर अॅट्रॉसिटी कायद्यानुसार गुन्हे दाखल करून संचालक मंडळ बरखास्त करावे व पीपीटी करार रद्द करावा.
- बहुकामाई मत्स्य व्यवसायिकांची सहकारी संस्था, वेरुळी बु. येथील पदाधिकाऱ्यांनी आदिवासी शेतकऱ्यांच्या जमिनी खोट्या सह्या व अंगठ्याद्वारे बळकावल्याने त्यांच्यावर गुन्हे दाखल करून सभासदपद रद्द करावे.
- पाचोरा व भडगाव शहर व ग्रामीण भागातील आदिवासी वस्त्यांवर शबरी घरकुल व प्रधानमंत्री आवास योजना अंतर्गत घरकुलांचा लाभ द्यावा.
- जन्माचा पुरावा नसल्याने आधारकार्ड मिळू शकत नसलेल्या आदिवासींना कोणतीही अट न ठेवता स्थानिक चौकशीद्वारे आधारकार्ड वाटप करावे.
- आदिवासी शेतकऱ्यांच्या शेतजमिनी भाडेतत्त्वावर देण्याचा शासन निर्णय रद्द करण्यात यावा.
मोर्चाच्या शेवटी प्रांताधिकारी यांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले. या मोर्चामुळे शहरातील काही भागात वाहतूक कोंडीची परिस्थिती निर्माण झाली होती. या जनआक्रोश मोर्चात मोठ्या संख्येने आदिवासी बांधव सहभागी झाले होते.
इतर महत्वाच्या बातम्या….
🛑 ब्रेकिंग: रावेर नगरपरिषदेची अंतिम प्रभाग रचना जाहीर, पहा प्रभागनिहाय यादी
🛑 ब्रेकिंग: पाचोरा नगरपालिकेत अर्ध्या जागांवर लाडक्या बहिणींना संधी, प्रभागनिहाय आरक्षण जाहीर
🚨 एमपीएससीकडून जंबो भरती, लाख रुपये पगार अन् ही आहे शैक्षणिक अर्हता




