आमदार प्रा. चंद्रकांत सोनवणे यांच्या हस्ते क्रीडा साहित्य देऊन सन्मान; स्थानिक महिला खेळाडूंना मार्गदर्शन करण्याचे आवाहन
जळगाव : जळगाव जिल्ह्यातील क्रीडा क्षेत्रासाठी अभिमानास्पद ठरलेल्या तीन महिला खेळाडूंचा जळगाव जिल्हा फुटबॉल व हॉकी जळगाव संघटनेतर्फे गौरवपूर्ण सत्कार करण्यात आला.
मलेशिया येथे आयोजित आंतरराष्ट्रीय इंडोर हॉकी स्पर्धेत सहभागी होऊन आंतरराष्ट्रीय स्तरावर जळगाव चे नाव उंचावणाऱ्या हॉकी जळगावच्या हिमाली विलास
बोरोले आणि ममता जगदीश प्रजापत, तसेच 15 वर्षांखालील फुटबॉल संघात जळगाव जिल्ह्यातून निवड झालेल्या शौर्य चौधरी या तीन खेळाडूंचा विशेष सन्मान करण्यात आला.

जळगाव क्रीडा महासंघाचे अध्यक्ष तथा चोपडा विधानसभा मतदारसंघाचे आमदार प्रा. चंद्रकांत सोनवणे यांच्या हस्ते तिन्ही खेळाडूंना क्रीडा साहित्य प्रदान करून त्यांचा गौरव करण्यात आला.
यावेळी आमदार प्रा. सोनवणे यांनी तिन्ही खेळाडूंचे मनःपूर्वक अभिनंदन केले. आंतरराष्ट्रीय स्पर्धेचा अनुभव घेऊन आलेल्या हिमाली बोरोले आणि ममता प्रजापत यांनी आपल्या अनुभवाचा लाभ जळगाव जिल्ह्यातील नवोदित महिला हॉकी खेळाडूंना द्यावा, त्यांना प्रोत्साहित करावे आणि अधिकाधिक मुलींना क्रीडा क्षेत्राकडे वळण्यासाठी प्रेरित करावे, असे आवाहन त्यांनी केले.
तसेच 15 वर्षांखालील फुटबॉल संघात निवड झालेल्या शौर्य चौधरीचे विशेष कौतुक करून तिच्या उज्ज्वल क्रीडा भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या.
जळगावच्या खेळाडूंनी जिल्ह्याच्या सीमा ओलांडून राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर आपली गुणवत्ता सिद्ध करणे ही संपूर्ण जिल्ह्यासाठी अभिमानाची बाब आहे. योग्य मार्गदर्शन, सातत्यपूर्ण सराव आणि प्रोत्साहन मिळाल्यास जळगावमधील महिला खेळाडू भविष्यात देशाचे प्रतिनिधित्व करून मोठे यश संपादन करू शकतात, असा विश्वास फारुक शेख यांनी व्यक्त केला.
या कार्यक्रमाला जळगाव जिल्हा फुटबॉल संघटनेचे तथा हॉकी जळगाव चे सचिव फारुक शेख, प्रा डॉ अनिता कोल्हे,फुटबॉल संघटनेचे प्रशिक्षक तौसिफ खान व पोदार इंटरनॅशनल स्कूलचे प्रशिक्षक कार्तिक आदी मान्यवर उपस्थित होते.
तीनही खेळाडूंच्या यशामुळे जळगावच्या क्रीडा क्षेत्राला नवी ऊर्जा आणि प्रेरणा मिळाली असून त्यांच्या यशाचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे.
