जिल्हा बँक निवडणूक : धरणगावच्या जागेसाठी शिवसैनिक आग्रही..प्रताप पाटील यांनी माघार घेऊ नये, कार्यकर्त्यांची गुलाबराव पाटलांकडे मागणी!
जळगाव : जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत धरणगाव सोसायटी मतदारसंघातील जागेवरून महायुतीत राजकीय पेच निर्माण झाला आहे. या जागेवरून शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) यांच्यात रस्सीखेच सुरू असल्याचे चित्र आहे. पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचे सुपुत्र प्रताप पाटील यांनी या मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल केला असून, राष्ट्रवादी काँग्रेसच्या सोनल पवार यांनीही उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. त्यामुळे महायुतीच्या जागावाटपात धरणगावची जागा नेमकी कोणाच्या वाट्याला जाणार, याबाबत उत्सुकता वाढली आहे.
धरणगावची जागा राष्ट्रवादी काँग्रेसला सुटणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू असतानाच प्रताप पाटील यांना उमेदवारी मागे घ्यावी लागू शकते, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे. मात्र, या संभाव्य माघारीला शिवसैनिकांकडून विरोध होत असल्याचे चित्र आहे. प्रताप पाटील यांनी कोणत्याही परिस्थितीत निवडणुकीतून माघार घेऊ नये, अशी ठाम भूमिका स्थानिक शिवसैनिकांनी घेतली आहे. धरणगावची जागा शिवसेनेनेच लढवावी, अशी मागणी कार्यकर्त्यांकडून पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्याकडे सातत्याने केली जात आहे.
जिल्हा बँक निवडणूक : वीस वर्षांपासून जागा शिवसेनेच्या ताब्यात नाही; कार्यकर्त्यांमध्ये अस्वस्थता!
धरणगाव सोसायटी मतदारसंघाची जागा गेल्या वीस वर्षांपासून शिवसेनेकडे नसल्याची बाबही सध्याच्या नाराजीमागे महत्त्वाची ठरत आहे. इतकी वर्षे प्रतीक्षा केल्यानंतर आता ही जागा शिवसेनेच्या वाट्याला यावी आणि पक्षाच्या उमेदवाराला निवडणूक लढवण्याची संधी मिळावी, अशी स्थानिक शिवसैनिकांची अपेक्षा आहे. त्यामुळे पुन्हा एकदा ही जागा मित्रपक्षाला सोडण्याची चर्चा सुरू झाल्याने कार्यकर्त्यांमध्ये अस्वस्थता निर्माण झाली आहे.

पक्षासाठी सातत्याने काम करणाऱ्या शिवसैनिकांना संधी कधी मिळणार, असा सवालही कार्यकर्त्यांच्या भूमिकेतून उपस्थित होत आहे. धरणगावची जागा शिवसेनेने लढवावी आणि प्रताप पाटील यांनी माघार घेऊ नये, यासाठी कार्यकर्ते आग्रही असल्याचे समजते. त्यामुळे हा विषय केवळ जागावाटपापुरता मर्यादित न राहता स्थानिक शिवसैनिकांच्या प्रतिष्ठेचा आणि राजकीय अस्तित्वाचा मुद्दा बनत चालला आहे.
जिल्हा बँक निवडणूक: पालकमंत्री गुलाबराव पाटील हे शिवसैनिकांची भावना लक्षात घेऊन निर्णय घेण्याची शक्यता
दरम्यान, महायुतीतील वरिष्ठ नेत्यांसमोर हा पेच कसा सोडवला जातो, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. पालकमंत्री गुलाबराव पाटील हे शिवसैनिकांची भावना लक्षात घेऊन काय निर्णय घेतात, प्रताप पाटील यांची उमेदवारी कायम राहते की त्यांना माघार घ्यावी लागते, हे लवकरच स्पष्ट होणार आहे. मात्र, वीस वर्षांपासून शिवसेनेच्या हातातून दूर असलेली धरणगावची जागा यंदा मिळवण्यासाठी शिवसैनिकांनी जोर लावल्याने महायुतीतील जागावाटपाचा तिढा अधिकच चर्चेत आला आहे.
इतर महत्वाच्या बातम्या…
धरणगावमध्ये शिवसेनेची संघटनात्मक बांधणी मजबूत करण्यावर भर; गुलाबराव पाटलांचा पदाधिकाऱ्यांना कानमंत्र
जिल्हा बँक निवडणुकीत महायुतीची आघाडी! शिवसेनेच्या दोन, भाजपच्या एका उमेदवाराची बिनविरोध निवड निश्चित



