रुंधाटी येथे गुरुपौर्णिमा महोत्सव भक्तिमय वातावरणात उत्साहात संपन्न.

रुंधाटी (ता. अमळनेर) : श्री कालभैरव जागृत देवस्थान सेवा समिती, रुंधाटी यांच्या वतीने गुरुपौर्णिमा महोत्सव अत्यंत भक्तिमय, धार्मिक व अध्यात्मिक वातावरणात मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
या पावन सोहळ्यानिमित्त महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून साधुसंत, भगतगण व हजारो भाविकांनी उपस्थित राहून श्री सद्गुरू दिलीप दादा यांचे तसेच बाबा कालभैरवांचे दर्शन घेतले व पवित्र आशीर्वाद प्राप्त केले.
महोत्सवादरम्यान विधीवत गुरुवंदना, गुरुपूजन, मंदिराचे पूजन, आरती, भजन-कीर्तन व विविध धार्मिक कार्यक्रम पार पडले. संपूर्ण परिसर भक्तिरसाने ओथंबून गेला असून प्रत्येक भाविकाने गुरुचरणी कृतज्ञता व्यक्त केली.
रुंधाटी येथील श्री कालभैरव जागृत देवस्थानाची तब्बल ८०० वर्षांची अखंड धार्मिक परंपरा आजही श्रद्धा, निष्ठा आणि भक्तिभावाने जपली जात आहे. ही परंपरा भाविकांसाठी प्रेरणादायी ठरत असून गुरु-शिष्य परंपरेचे महत्त्व या महोत्सवातून अधोरेखित झाले.
या भव्य व दिव्य गुरुपौर्णिमा महोत्सवाचे यशस्वी आयोजन श्री कालभैरव जागृत देवस्थान सेवा समिती, रुंधाटी यांच्या वतीने करण्यात आले. उपस्थित भाविकांनी या सोहळ्याचे मनापासून कौतुक करत हा महोत्सव श्रद्धा, संस्कृती आणि अध्यात्म यांचा अद्वितीय संगम असल्याची भावना व्यक्त केली.




