“एक पेड़ माँ के नाम” उपक्रमातून पर्यावरण संवर्धनाचा संदेश; वृक्षारोपणासह महापौरांचा सत्कार.

जळगाव : भारतीय जनता पार्टी जळगाव महानगर विश्वकर्मा योजना सेलच्या वतीने तथा मा. महेशजी वर्मा यांच्या सहकार्याने त्यांच्या मातोश्री स्व. पद्माबाई वर्मा यांच्या वाढदिवसानिमित्त “एक पेड़ माँ के नाम” या उपक्रमांतर्गत गजानन कॉलनी उद्यान (मधुबन अपार्टमेंटजवळ) येथे वृक्षारोपणाचा प्रेरणादायी कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला.
कार्यक्रमाला जळगाव शहराचे आमदार मा. राजूमामा भोळे, भारतीय जनता पार्टीचे जिल्हा महानगराध्यक्ष मा. दीपक सूर्यवंशी, जळगाव महानगरपालिकेच्या महापौर सौ. दीपमाला काळे तसेच भाजप विश्वकर्मा योजना सेलचे जिल्हा महानगराध्यक्ष मा. संजय विसपुते यांची प्रमुख उपस्थिती लाभली.
यावेळी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते विविध वृक्षांची लागवड करण्यात आली. “एक पेड़ माँ के नाम” या संकल्पनेतून प्रत्येकाने आपल्या आईच्या स्मरणार्थ किमान एक वृक्ष लावून त्याचे संगोपन करण्याचा निर्धार करावा, असा संदेश देत पर्यावरण संरक्षणाचे महत्त्व अधोरेखित करण्यात आले.
कार्यक्रमात पंढरपूर सायकल वारी यशस्वीरीत्या पूर्ण केल्याबद्दल महापौर सौ. दीपमाला काळे यांचा शाल, पुष्पगुच्छ व सत्कारचिन्ह देऊन विशेष गौरव करण्यात आला. तसेच त्यांच्या वाढदिवसानिमित्त पुष्पगुच्छ अर्पण करून त्यांना हार्दिक शुभेच्छा देण्यात आल्या. उपस्थितांनी टाळ्यांच्या गजरात त्यांचा सत्कार करत त्यांच्या सामाजिक कार्याचे कौतुक केले.
यावेळी मान्यवरांनी पर्यावरण संवर्धन ही केवळ शासकीय मोहीम नसून प्रत्येक नागरिकाची सामूहिक जबाबदारी असल्याचे सांगितले. वाढते प्रदूषण, हवामान बदल आणि वृक्षतोड यावर मात करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर वृक्षलागवड व वृक्षसंवर्धनाची गरज असल्याचे त्यांनी नमूद केले. लावलेला प्रत्येक वृक्ष भविष्यातील पिढ्यांसाठी अमूल्य ठेवा ठरणार असल्याचेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.
या कार्यक्रमास विनोद भाऊ दंडगव्हाळ, संदीप अरुण डोलारे, संजय जगताप, अशोक शिंपी, विजय वानखेडे, अशोक टिळकपुरे, अखिल टिळकपुरे, राजेश बेहडे, किरण ओझा, लखीचंद उपाध्ये, संजय सोनवणे, सौ. अनिता सोनवणे, सौ. लिलाबाई भागवत सोनार, सौ. वैशाली अतुल देशमुख, सौ. वर्षा संजय महाजन, सौ. संगीता माहेश्वरी, कु. प्रेरणा माहेश्वरी, सुधाकर पाटील, उमेश ओक, जयदीप तायडे यांच्यासह भारतीय जनता पार्टी विश्वकर्मा सेलचे पदाधिकारी, सदस्य आणि परिसरातील अनेक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संजय जगताप यांनी केले, तर आभार प्रदर्शन संदीप अरुण डोलारे यांनी मानले.
पर्यावरण संवर्धनाचा प्रभावी संदेश देणारा हा उपक्रम नागरिकांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे यशस्वी ठरला. “एक पेड़ माँ के नाम” या संकल्पनेतून समाजात पर्यावरणाबाबत जागरूकता निर्माण करण्यास निश्चितच हातभार लागणार असल्याची भावना यावेळी व्यक्त करण्यात आली.



