ग्रामपंचायतीकडे वारंवार तक्रारी करूनही अतिक्रमण हटविण्यास टाळाटाळ ; नागरिकाचा उपोषणाचा इशारा.

तक्रारीनुसार, काही व्यक्तींनी घर बांधकाम करताना सार्वजनिक रस्त्यावर अतिक्रमण करून नागरिकांच्या ये-जा करण्याच्या मार्गात अडथळा निर्माण केला आहे. याशिवाय पावसाच्या पाण्याची नाली बंद केल्याने परिसरात पाणी साचण्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. ग्रामस्थांच्या मते, हे अतिक्रमण थेट ग्रामपंचायत प्रशासनाच्या निष्क्रियतेमुळे वाढीस लागले आहे.
विशेष म्हणजे, संबंधित प्रकरणात ग्रामपंचायतीने नोटीस दिल्याचे सांगितले जात असले तरी प्रत्यक्षात अतिक्रमण हटविण्याची कोणतीही कारवाई करण्यात आलेली नाही. उलट संबंधित अतिक्रमणधारकांकडून बांधकाम सुरूच असल्याचा आरोप करण्यात आला आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये तीव्र नाराजीचे वातावरण निर्माण झाले आहे.
ग्रामपंचायत प्रशासनाच्या दुर्लक्षाविरोधात उपोषणाचा इशारा
विजय बडगुजर यांनी ग्रामपंचायत तसेच पंचायत समिती कार्यालय, अमळनेर येथे अनेक वेळा लेखी निवेदने सादर करून रस्ता व नाली तात्काळ मोकळी करण्याची मागणी केली आहे. मात्र प्रशासनाकडून केवळ आश्वासने दिली जात असून प्रत्यक्ष कारवाई होत नसल्याचा आरोप त्यांनी केला आहे.
या प्रकरणामुळे गावात संतापाची लाट उसळली असून प्रशासनाने तातडीने हस्तक्षेप करून अतिक्रमण हटवावे, अशी जोरदार मागणी ग्रामस्थांकडून होत आहे.



