हॅलो राजकारण

पेट्रोल पंपांवर ऑनलाइन पेमेंट स्वीकारा ; शेतकऱ्यांना डब्यात डिझेल द्या — मनसे

जळगाव : शहरासह संपूर्ण जिल्ह्यात निर्माण झालेल्या पेट्रोल व डिझेल टंचाईच्या पार्श्वभूमीवर आक्रमक झाली असून नागरिक व शेतकऱ्यांच्या समस्यांबाबत पुरवठा विभागाकडे निवेदन सादर करण्यात आले. पेट्रोल पंपांवर ऑनलाइन पेमेंट सक्तीने स्वीकारावे तसेच शेतकऱ्यांना डब्यात डिझेल देण्यास मनाई करू नये, अशी जोरदार मागणी करण्यात आली.

सध्या जिल्ह्यातील अनेक पेट्रोल पंपांवर नागरिकांना चार ते पाच तास रांगेत उभे राहून इंधन घ्यावे लागत आहे. मात्र एवढा वेळ प्रतीक्षा करूनही अनेक पंप चालक ऑनलाइन पेमेंट स्वीकारण्यास नकार देत असल्याने नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. “फक्त कॅश द्या” अशी अट घालून ग्राहकांची गैरसोय केली जात असल्याचा आरोप मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी केला.

देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी “डिजिटल इंडिया” व “कॅशलेस इंडिया” मोहिमेद्वारे ऑनलाइन व्यवहारांना प्रोत्साहन दिले असताना काही पेट्रोल पंप चालक शासनाच्या धोरणालाच हरताळ फासत असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.

याशिवाय शेतकरी बांधवांनाही मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत असल्याचे सांगण्यात आले. शेतीसाठी वापरण्यात येणारे पंप, जनरेटर, फवारणी यंत्रे, पॉवर टिलर यांसारखी अवजारे प्रत्यक्ष पेट्रोल पंपावर आणणे शक्य नसतानाही काही पेट्रोल पंप चालक शेतकऱ्यांना डब्यात पेट्रोल किंवा डिझेल देण्यास टाळाटाळ करीत असल्याच्या तक्रारी करण्यात आल्या. त्यामुळे शेतीकामांवर परिणाम होत असल्याचे मनसेने स्पष्ट केले.

मनसेने प्रशासनाकडे खालील प्रमुख मागण्या केल्या आहेत.

🔸सर्व पेट्रोल पंपांवर UPI, QR Code व कार्ड पेमेंट सक्तीने स्वीकारण्याचे आदेश द्यावेत.

🔹ऑनलाइन पेमेंट नाकारणाऱ्या पेट्रोल पंपांवर तात्काळ कारवाई करावी.

🔸पेट्रोल-डिझेल टंचाईच्या काळात नागरिकांना त्रास होणार नाही यासाठी विशेष नियंत्रण ठेवावे.

🔹शेतकरी बांधवांना डब्यात इंधन देण्याबाबत स्पष्ट सूचना सर्व पंप चालकांना द्याव्यात.

प्रत्येक पेट्रोल पंपावर “ऑनलाइन पेमेंट उपलब्ध आहे” असे फलक लावणे बंधनकारक करावे.

यावेळी पुरवठा अधिकारी महेश चौधरी यांनी निवेदनाची दखल घेत सकारात्मक प्रतिसाद दिला. संबंधित विषयावर तात्काळ कारवाईसंदर्भात आदेशाचे पत्र काढण्यात येईल, असे आश्वासन त्यांनी दिल्याचे मनसे पदाधिकाऱ्यांनी सांगितले.

या प्रसंगी ॲड. जमील देशपांडे, उप महानगराध्यक्ष श्रीकृष्ण मेंगडे, ललित शर्मा, राजेंद्र निकम, प्रकाश जोशी, महिला शाखाध्यक्ष अनिता कापुरे, लक्ष्मी बिल, राहुल चव्हाण, राजेश मराठे, बादशहा शहा, अमजित खाटीक, दीपक राठोड, महेंद्र सपकाळे यांच्यासह असंख्य महाराष्ट्र सैनिक उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button