महिंदळे ग्रामस्थांचे तहसील कार्यालयासमोर एकदिवसीय उपोषण

भडगाव प्रतिनिधी : यशकुमार पाटील
ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार, सन २०२२-२३ मध्ये जल जीवन मिशन अंतर्गत गावात पाईपलाईन टाकण्यात आली. मात्र सदर काम निकृष्ट दर्जाचे झाल्याने गावात आजही नियमित पाणीपुरवठा होत नसल्याचा आरोप करण्यात आला. अंदाजपत्रकानुसार काम न होता केवळ कागदोपत्री कामे पूर्ण दाखविण्यात आल्याची तक्रारही यावेळी करण्यात आली.
तसेच बसस्टॉप परिसरात बसविण्यात आलेली अॅक्वा यंत्रणा स्थापनेपासूनच बंद अवस्थेत असल्याने नागरिक व विद्यार्थ्यांना त्याचा कोणताही लाभ मिळत नसल्याचे ग्रामस्थांनी सांगितले. उलट बसण्याची सोय उपलब्ध नसल्याने विद्यार्थ्यांना उन्हात-पावसात उभे राहावे लागत असल्याची समस्या त्यांनी मांडली.
शेत पाणंद रस्त्यांची कामे मंजूर असूनही प्रत्यक्षात कामे न झाल्याने शेतकऱ्यांना शेतात ये-जा करण्यास तसेच माल वाहतुकीस अडचणी निर्माण होत असल्याचेही आंदोलनकर्त्यांनी नमूद केले. शासनाकडून निधी मंजूर होऊनही विकासकामे पूर्ण न झाल्यामुळे ग्रामस्थांनी तीव्र नाराजी व्यक्त केली.
या सर्व प्रकरणांची सक्षम अधिकाऱ्यांकडून सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी, निकृष्ट कामांची रक्कम वसूल करावी व संबंधित जबाबदार पदाधिकाऱ्यांची चौकशी करावी, अशी ठाम मागणी उपोषणकर्त्यांनी केली.
“महिंदळे गावातील विकासकामांबाबत पारदर्शक चौकशी होऊन दोषींवर कारवाई झाली पाहिजे,” अशी एकमुखी भूमिका ग्रामस्थांनी यावेळी मांडली.



