वाढदिवसानिमित्त सफाई कर्मचाऱ्यांचा सन्मान ; मोफत रेनकोटचे वाटप.

कु. लक्षिता लखीचंद पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त शिवसेना-युवासेना व स्व. बापूजी युवा फाउंडेशनचा सेवाभावी उपक्रम.
भडगाव : वाढदिवस हा केवळ आनंदोत्सवाचा दिवस न मानता समाजासाठी काहीतरी विधायक करण्याची संधी असावी, या भावनेतून शिवसेना-युवासेना व स्व. बापूजी युवा फाउंडेशन यांच्या वतीने कु. लक्षिता लखीचंद पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त भडगाव नगरपालिकेतील सफाई कर्मचाऱ्यांना मोफत रेनकोटचे वाटप करण्यात आले. समाजासाठी अहोरात्र सेवा बजावणाऱ्या कर्मचाऱ्यांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याच्या उद्देशाने हा उपक्रम आयोजित करण्यात आला.
पावसाळ्यात प्रतिकूल परिस्थितीतही शहराची स्वच्छता राखण्यासाठी कार्यरत असलेल्या सफाई कर्मचाऱ्यांचा यावेळी सन्मान करण्यात आला. कार्यक्रमात सफाई कर्मचाऱ्यांच्या हस्ते केक कापून वाढदिवस साधेपणाने, आत्मीयतेने आणि सामाजिक बांधिलकीच्या वातावरणात साजरा करण्यात आला. “समाजासाठी कार्य करणाऱ्यांचा सन्मान हीच वाढदिवसाची खरी भेट” हा संदेश या उपक्रमातून देण्यात आला.
यावेळी गटनेते लखीचंद पाटील यांनी वाढदिवसासारख्या वैयक्तिक आनंदाच्या क्षणांना समाजोपयोगी कार्याची जोड दिल्यास समाजात सेवाभावाची प्रेरणा निर्माण होते, असे सांगितले. समाजासाठी निस्वार्थपणे कार्य करणाऱ्या कर्मचाऱ्यांप्रती कृतज्ञता व्यक्त करणे ही प्रत्येकाची जबाबदारी असल्याचे त्यांनी नमूद केले.
कार्यक्रमास नगरसेवक संतोष महाजन, जग्गू भोई, अतुल पाटील, जहांगीर मालचे, देवाजी आहिरे, विजयकुमार भोसले, राहुल ठाकरे, महेंद्र ततार, वाल्मिक पवार, पिंटू मराठे, भोला पाटील यांच्यासह स्व. बापूजी युवा फाउंडेशनचे पदाधिकारी, संचालक, सदस्य, शिवसेना-युवासेनेचे कार्यकर्ते व नागरिक उपस्थित होते.
सलग तिसऱ्या वर्षी राबविण्यात आलेल्या या उपक्रमाचे नागरिकांनी स्वागत केले. “स्वतःचा आनंद समाजाच्या सेवेत वाटला, तरच वाढदिवस खऱ्या अर्थाने संस्मरणीय ठरतो,” हा संदेश देत सामाजिक बांधिलकी जपणाऱ्या या उपक्रमाचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे.



