पाचोरा तालुक्यात चोरट्यांचा सुळसुळाट, जारगावात घरफोडी लाखोंचा ऐवज लंपास

हॅलो जनता न्युज विशेष प्रतिनिधी (गजानन गिरी)
पाचोरा शहरासह परिसरात चोरट्यांचा सुळसुळाट वाढला असून पाचोरा तालुक्यातील जारगाव येथील सेवानिवृत्त पोस्टमास्तर यांच्या बंद घरात चोरट्यांनी डल्ला मारून लाखों रुपयांचा ऐवज लंपास केला आहे. या प्रकरणी पाचोरा पोलिस स्थानकात अज्ञात चोरट्याविरोधात चोरीचा गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे की, सेवानिवृत्त पोस्टमास्तर सुभाष फकिरा मोरे यांचे जारगाव येथील सिद्धीविनायक नगर येथे घर आहे. सुभाष मोरे हे लग्न समारंभासाठी २१ फेब्रुवारी रोजी छत्रपती संभाजीनगर येथे गेले असून दि. २५ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ४:३० वाजता सुभाष मोरे हे घरी आले असता घराच्या बाहेर असलेल्या चप्पल स्टॅण्डवर घराचे कुलूप पडलेले होते. घराचा कडीकोंडा तुटलेला अवस्थेत त्यांना पाहायला मिळाला.
घराचे कुलूप तुटलेले पाहून सुभाष मोरे यांनी घरात प्रवेश केला असता सर्व सामान अस्ताव्यस्त असलेला दिसला. सुभाष मोरे यांनी घरातील कपाटात ठेवलेले ५० हजार रुपये किंमतीची १० ग्रॅम वजनाची सोन्याची अंगठी, ४० हजार रुपये किंमतीच्या प्रत्येकी ८ ग्रॅम वजनाच्या दोन सोन्याच्या अंगठ्या, १० हजार रुपये किंमतीचे चांदीची समई, अगरबत्ती स्टॅण्ड, ताटली, लक्ष्मीचे काॅईन यासह ३७ हजार रुपये रोख असा १ लाख ३७ हजार रुपयांचा मुद्देमाल अज्ञात चोरट्यानी चोरुन नेल्याचे निदर्शनास आले. सुभाष मोरे यांनी तत्काळ पाचोरा पोलिस स्टेशन गाठत अज्ञात चोरट्याविरुद्ध चोरीचा गुन्हा नोंदविण्यात आला आहे. या घटनेचा पुढील तपास पोलिस निरीक्षक अशोक पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक सोपान गोरे हे करीत आहे.
चोरांचा बंदोबस्त करण्यासाठी पोलिसांनी गस्त वाढवण्याची मागणी
पाचोरा शहरासह तालुक्यात अनेक भागात चोरीच्या अनेक घटना उघडकीस येत आहेत त्यामुळे पोलिसांनी या घटनांची दखल घेऊन ग्रस्त वाढवावी तसेच अशा घटना घडू नये म्हणून प्रतिबंधात्मक कारवयांवर भर द्यावा अशी मागणी नागरिकांनी केली आहे.