हॅलो जनता न्यूज, जळगाव : जिल्हा परिषद (जि.प.) आणि पंचायत समितीच्या सार्वत्रिक निवडणुका पुन्हा एकदा लांबणीवर पडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. सर्वोच्च न्यायालयाने राज्य सरकारला या निवडणुका ३१ जानेवारी २०२६ पर्यंत संपविण्याचे आदेश दिले असले, तरी सध्या राज्य निवडणूक आयोगाने मतदार यादी तयार करण्याच्या कार्यक्रमाला मुदतवाढ दिल्याने संपूर्ण प्रक्रियेत विलंब होण्याची शक्यता आहे.
साडेतीन वर्षांपासून प्रशासकांच्या हाती जिल्हा परिषद
जळगाव जिल्हा परिषदेचा सदस्यांचा कार्यकाळ मार्च २०२२ मध्येच संपला आहे. त्यानंतर तब्बल साडेतीन वर्षांपासून जिल्हा परिषदेत प्रशासकराज सुरू आहे. जळगाव जिल्हा परिषदेची शेवटची निवडणूक फेब्रुवारी २०१७ मध्ये झाली होती. म्हणजेच साडेआठ वर्षांपासून जिल्हा परिषद निवडणूक झालेली नाही. या दीर्घ प्रतीक्षेमुळे जिल्ह्यातील सर्व राजकीय पक्ष, माजी सदस्य आणि मतदार वर्ग यांच्यात प्रचंड उत्सुकता आणि असंतोष दिसून येत आहे.
सर्वोच्च न्यायालयाचा स्पष्ट आदेश : ३१ जानेवारीपर्यंत जिल्हा परिषद निवडणुका पूर्ण करा
राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ३१ जानेवारी २०२६ पूर्वी पूर्ण कराव्यात, असा स्पष्ट आदेश सर्वोच्च न्यायालयाने राज्य सरकारला दिला आहे. त्यामुळे आता राज्य निवडणूक आयोग आणि प्रशासनाला या कालमर्यादेतच सर्व प्रक्रिया पूर्ण करणे भाग आहे. मतदारयादीच्या मुदतवाढीमुळे निवडणुकीचा कार्यक्रम काहीसा मागे गेला असला, तरी कायदेशीर दृष्टीने आयोगाला निर्धारित तारखेपूर्वी निवडणुका घेणे अपरिहार्य ठरणार आहे.
नागरिकांची अपेक्षा : जिल्हा परिषद निवडणुका वेळेत व्हाव्यात
गेल्या अनेक वर्षांपासून विकास कामांवर प्रशासकीय निर्णयांचा प्रभाव पडत असल्याने ग्रामीण भागातील नागरिक आता निवडून आलेल्या प्रतिनिधींच्या हाती सत्ता यावी, अशी मागणी व्यक्त करत आहेत. “लोकशाही व्यवस्थेत लोकप्रतिनिधींची गरज आहे. प्रशासकांमार्फत कामे होत असली तरी लोकांचा आवाज पोहोचविण्यासाठी निवडणुका वेळेत होणे आवश्यक आहे,” असे नागरिकांचे मत आहे.
एकूणच मतदार यादीच्या मुदतवाढीमुळे जळगाव जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुका काही काळ पुढे ढकलल्या जाण्याची शक्यता आहे. तरीही, सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार ३१ जानेवारी २०२६ पूर्वी या निवडणुका होणारच, याबाबत कोणतीही शंका नाही.

इतर महत्वाच्या बातम्या…
🚨 ब्रेकिंग : मंत्री छगन भुजबळ यांना छातीत दुखल्याने रुग्णालयात दाखल, हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू
🚨 ब्रेकिंग: जळगाव जिल्ह्यातील १४ वाळू घाटांसाठी ई-लिलाव प्रक्रिया सुरू
🚨 पोकरा योजना : नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प (पोकरा टप्पा २) भरती प्रक्रिया सुरू!
