💥 ब्रेकींग : पाचोरा हादरले, चारित्र्याच्या संशयातून पतीने पत्नीचा गळा चिरून खून

हॅलो जनता न्यूज, पाचोरा | २० जुलै २०२५ –
पाचोरा तालुक्यातील जारगाव येथे चारित्र्याच्या संशयावरून पतीने पत्नीचा धारदार शस्त्राने गळा चिरून खून केल्याची धक्कादायक घटना आज (शनिवार) पहाटे चार वाजेच्या सुमारास घडली. मयत महिलेचे नाव प्रियंका भदाणे (वय २५) असे असून, आरोपी पती पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
दोघेही जारगाव येथील श्रीकृष्ण हौसिंग सोसायटी मध्ये आपल्या दोन लहान मुलांसह भाड्याच्या घरात वास्तव्यास होते. प्राथमिक माहितीनुसार, घरगुती वाद आणि पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेत पतीने धारदार शस्त्राने प्रियंकाचा गळा चिरून तिचा खून केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
हृदयद्रावक बाब म्हणजे, आरोपीने गुन्हा केल्यानंतर स्वतःही आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. तो घरात फाशी घेण्याचा प्रयत्न करत होता. मात्र, घरात असलेल्या लहान मुलांनी रडत घराबाहेर येऊन मदतीसाठी आरडाओरड केली. त्यामुळे शेजाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत परिस्थितीची माहिती पोलिसांना दिली.
पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी पोहोचून आरोपी पतीला ताब्यात घेतले असून पुढील तपास पाचोरा पोलिस ठाण्याचे अधिकारी करीत आहेत. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. दोन चिमुकल्यांपुढे आई गेली आणि वडील तुरुंगात – त्यामुळे ही घटना अधिकच दु:खद बनली आहे. पोलिसांकडून प्राथमिक चौकशी सुरू असून आरोपीकडून अधिक माहिती घेतली जात आहे.




