💥 ब्रेकिंग : “मुख्यमंत्री लाडकी बहीण” योजना, e-KYC सुविधा सुरू, इतके दिवस मुदत…

हॅलो जनता न्यूज, मुंबई, – राज्यातील महिलांच्या आर्थिक स्वावलंबनासाठी राबविण्यात येणाऱ्या “मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण” या योजनेत पारदर्शकता आणण्यासाठी आणि लाभार्थ्यांना नियमित आर्थिक सहाय्य मिळावे याकरिता आता e-KYC प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. यासाठी खास https://ladakibahin.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर ही सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. लाभार्थी महिला स्वत:च्या मोबाईलवरूनही ही प्रक्रिया सहज करू शकतील, अशी माहिती महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी दिली.
पुढील दोन महिन्यांत सर्व लाभार्थींनी ही प्रक्रिया पूर्ण करणे आवश्यक असून, यामुळे भविष्यातील इतर शासकीय योजनांचा लाभ मिळविणे देखील सुलभ होईल, असेही त्यांनी स्पष्ट केले. लाभार्थींनी गोंधळून न जाता ही प्रक्रिया स्वत: करावी तसेच कोणीही यासाठी आर्थिक मागणी केल्यास त्याला बळी पडू नये, असे आवाहनही त्यांनी केले.
e-KYC : महिलांच्या सक्षमीकरणासाठी महत्त्वपूर्ण योजना
महिलांच्या आर्थिक स्वातंत्र्यासोबतच त्यांच्या आरोग्य, पोषण आणि कुटुंबातील निर्णायक भूमिकेला बळ देण्यासाठी ही योजना राज्य सरकारकडून राबवली जात आहे. या योजनेतून लाभार्थींना थेट लाभ हस्तांतरण (Direct Benefit Transfer – DBT) पद्धतीने आर्थिक सहाय्य दिले जाते. आता e-KYC माध्यमातून आधार प्रमाणीकरण करून ही योजना आणखी पारदर्शक करण्यात आली आहे.
लाडकी बहीण योजना : e-KYC प्रक्रिया कशी करावी?
- https://ladakibahin.maharashtra.gov.in या संकेतस्थळाला भेट द्यावी.
- मुखपृष्ठावरील e-KYC बॅनर वर क्लिक केल्यास e-KYC फॉर्म उघडेल.
- फॉर्ममध्ये लाभार्थ्याने आपला आधार क्रमांक व पडताळणी संकेतांक (Captcha Code) भरून, आधार प्रमाणीकरणासाठी संमती देत Send OTP वर क्लिक करावे.
- त्यानंतर लाभार्थ्याच्या आधार-लिंक मोबाईलवर OTP येईल. हा OTP टाकून Submit वर क्लिक करावे.
- प्रणाली तपासेल की e-KYC आधीच पूर्ण झाली आहे की नाही.
- जर e-KYC पूर्ण असेल, तर “e-KYC आधीच पूर्ण झाली आहे” असा संदेश दिसेल.
- जर पूर्ण नसेल, तर आधार क्रमांक पात्र लाभार्थी यादीत आहे का हे तपासले जाईल.
- पात्र यादीत नाव असल्यास पुढील टप्प्याला जाता येईल. त्यात लाभार्थ्याने पती किंवा वडिलांचा आधार क्रमांक व कॅप्चा भरून प्रक्रिया पूर्ण करावी.
इतर महत्वाच्या बातम्या…
💥 जळगाव ब्रेकिंग : भाजप कार्यकर्त्याच्या घरावर ईडीचा छापा, १३ तासांपेक्षा अधिक काळ तपासणी..




