पाच पावली मित्र मंडळाच्या गणरायाचे कजगांवात उत्साहात आगमन.
ढोल-ताशांचा गजर, फटाक्यांची आतषबाजी अन् ‘गणपती बाप्पा मोरया’च्या जयघोषाने परिसर दुमदुमला
हॅलो जनता प्रतिनिधी : जगदीश अमृतकर कजगांव
कजगांव : कजगांव येथे पाच पावली मित्र मंडळाच्या गणरायाचे रविवारी मोठ्या उत्साहात, जल्लोषात आणि भक्तिमय वातावरणात आगमन झाले. गणरायाच्या आगमनानिमित्त काढण्यात आलेल्या मिरवणुकीत ढोल-ताशांचा गजर, फटाक्यांची आतषबाजी आणि गणपती बाप्पाच्या जयघोषाने संपूर्ण परिसर दुमदुमून गेला.

भव्य गणेशमूर्तीचे आगमन होताच मंडळाच्या कार्यकर्त्यांसह भाविकांनी उत्स्फूर्तपणे गणरायाचे स्वागत केले. मिरवणुकी दरम्यान नागरिकांची मोठी गर्दी झाली होती. लहानांपासून ज्येष्ठांपर्यंत नागरिकांनी उत्साहाने सहभाग घेत ‘गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया’ च्या जयघोषात गणरायाचे स्वागत केले.
मिरवणुकीत मंडळाचे कार्यकर्ते पारंपरिक वेशभूषेत सहभागी झाले होते. ढोल-ताशांच्या तालावर तरुणाईने उत्साहात जल्लोष केला. गणरायाच्या दर्शनासाठी नागरिकांनी रस्त्याच्या दुतर्फा गर्दी केली होती. संपूर्ण वातावरणात उत्साह, भक्ती आणि आनंदाचे वातावरण निर्माण झाले होते.
मिरवणूक नियोजित ठिकाणी पोहोचल्यानंतर पाच पावली मित्र मंडळाच्या कार्यकर्त्यांनी गणरायाची विधिवत पूजा-अर्चा करून स्थापना केली. यानंतर गणेशोत्सवाच्या धार्मिक व सामाजिक उपक्रमांना सुरुवात झाली.
गणेशोत्सवाच्या काळात मंडळाच्या वतीने विविध धार्मिक, सामाजिक आणि समाजोपयोगी उपक्रमांचे आयोजन करण्यात येणार असून, नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन मंडळाच्या कार्यकर्त्यांकडून करण्यात आले.



