श्रीक्षेत्र कनाशी येथे गुरुपौर्णिमेनिमित्त ‘देवाची दाढ’ विशेष दर्शन; हजारो भाविकांच्या उपस्थितीत यात्रा महोत्सवाला उत्साह.

कजगांव (प्रतिनिधी) : भडगाव तालुक्यातील श्रीक्षेत्र कनाशी येथे गुरुपौर्णिमेनिमित्त देवाच्या ‘दाढ विशेष दर्शन’ व यात्रा महोत्सवाचे भक्तिमय वातावरणात आयोजन करण्यात आला होता. मंगळवार व बुधवार, दि. २८ व २९ जुलै २०२६ रोजी होणाऱ्या या महोत्सवासाठी महाराष्ट्रासह देशातील विविध राज्यांतून हजारो भाविकांनी हजेरी लावली.
श्री कन्हैयालाल बाबा मंदिराचे व्यवस्थापकीय पुरोगामी पुजारी व ग्रामस्थांनी भाविकांना सुरळीत दर्शन मिळावे यासाठी उत्कृष्ट नियोजन केले आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाही मंदिर परिसरात दर्शनासाठी एक ते दोन किलोमीटरपर्यंत रांगा लागत असून, भाविक शांततेत व शिस्तबद्ध पद्धतीने दर्शन घेत आहेत.
यात्रेदरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी जळगाव, भडगाव व चाळीसगाव पोलीस ठाण्यांच्या पोलिस निरीक्षकांसह मोठा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. वाहतूक नियंत्रण, गर्दी व्यवस्थापन व सुरक्षा यासाठी स्वतंत्र नियोजन करण्यात आले आहे.
भाविकांच्या आरोग्य सेवेसाठी तालुका वैद्यकीय अधिकारी, कजगाव प्राथमिक आरोग्य केंद्र, कनाशी उपकेंद्राचे वैद्यकीय अधिकारी, आरोग्य कर्मचारी तसेच बोदर्डे, कोठली, निंभोरा, गोंडगाव, कनाशी, देव्हारी, लोण व बोरणार येथील आशा सेविका सेवेत कार्यरत आहेत.
यात्रेत मिठाई, खेळणी, झुले, संसारोपयोगी साहित्य तसेच विविध व्यावसायिकांची दुकाने आकर्षणाचे केंद्र ठरत आहेत. मंदिरात दर्शनासाठी येणारे भाविक नारळ, विड्याची दोन पाने व देठ, सुपारी, फळे, फुले, नैवेद्य व दक्षिणा अर्पण करून आपल्या मनोकामना पूर्ण होण्यासाठी प्रार्थना करत आहेत.
मुसळधार पावसातही पंजाब, दिल्ली, चंदीगड, हरियाणा, जम्मू-काश्मीर तसेच मुंबई, पुणे, नाशिक, सातारा, सांगली, नागपूर आदी ठिकाणांहून हजारो भाविक दर्शनासाठी श्रीक्षेत्र कनाशी येथे दाखल होत आहेत. गुरुपौर्णिमा महोत्सवामुळे संपूर्ण परिसर भक्तिमय वातावरणाने भारावून गेला आहे.
याशिवाय महंत श्री. खामनीकर बाबा व श्री. लांडगे बाबा यांच्या आश्रमात भाविकांसाठी महाप्रसादाची व्यवस्था करण्यात आली असून, हजारो भाविक त्याचा लाभ घेत आहेत.




