⁠हॅलो शेतकरी

केळीच्या एका झाडाला २०० हून अधिक कंबळ.

केळीच्या एका झाडाला २०० हून अधिक कंबळ.

भडगाव तालुक्यात निसर्गाचा थक्क करणारा चमत्कार !

भडगाव : तालुक्यातील वाडे गावात निसर्गाने जणू आपल्या किमयेची अनोखी झलक दाखवली आहे. केळीच्या झाडाला साधारणपणे एकच कंबळ (फूल) येणे ही नैसर्गिक बाब असते, तर अत्यंत अपवादात्मक परिस्थितीत दोन किंवा तीन कंबळे दिसून येतात. मात्र वाडे येथील प्रगतिशील शेतकरी शांताराम भगवान गोठवाळ यांच्या शेतातील एका केळीच्या झाडाला तब्बल २०० हून अधिक कंबळे आल्याचा दावा समोर आल्याने संपूर्ण परिसरात आश्चर्य व्यक्त केले जात आहे. सुमारे एक एकर क्षेत्रात केळीची लागवड केलेल्या शांताराम गोठवाळ यांनी अत्यंत मेहनत, योग्य व्यवस्थापन आणि आधुनिक पद्धतींचा अवलंब करून बाग फुलवली आहे. बागेतील सर्व झाडे नियमित वाढत असताना एका झाडावर मात्र अभूतपूर्व स्वरूपाचे कंबळांचे प्रमाण दिसून आले. या दुर्मीळ दृश्यामुळे शेतकरी, कृषीप्रेमी आणि नागरिकांची पावले थेट शेताकडे वळू लागली आहेत. गावात या घटनेची माहिती वाऱ्यासारखी पसरल्यानंतर दररोज अनेक जण प्रत्यक्ष पाहणीसाठी शेतात भेट देत आहेत. अनेकांनी आपल्या आयुष्यात प्रथमच असे दृश्य पाहिल्याचे सांगितले. मोबाईलमध्ये छायाचित्रे आणि व्हिडिओ टिपण्यासाठीही मोठी गर्दी होत असून हा विषय चर्चेचा केंद्रबिंदू ठरला आहे. कृषी क्षेत्रातील जाणकारांच्या मते, केळीच्या वाढीदरम्यान काही वेळा जैविक किंवा जनुकीय बदलांमुळे असामान्य वाढ दिसून येऊ शकते. तथापि, एका झाडावर इतक्या मोठ्या संख्येने कंबळे येणे ही अत्यंत दुर्मीळ बाब असून यामागील नेमके कारण वैज्ञानिक तपासणीनंतरच स्पष्ट होऊ शकते. शेतकरी शांताराम भगवान गोठवाळ म्हणाले, “माझ्या एक एकर केळी बागेतील सर्व झाडांना नेहमीप्रमाणे एकच कंबळ आले आहे. मात्र एका झाडावर अचानक मोठ्या प्रमाणात कंबळे दिसू लागली. सुरुवातीला माझाही विश्वास बसत नव्हता. आता हे अनोखे दृश्य पाहण्यासाठी अनेक शेतकरी आणि नागरिक शेतात येत आहेत.”

“मी मेहनतीने केळीची लागवड केली आहे. सर्व झाडे सामान्य आहेत; मात्र एका झाडावर एवढ्या मोठ्या प्रमाणात कंबळे दिसल्याने मलाही आश्चर्य वाटले. ही निसर्गाची विलक्षण किमया असून अनेक जण ते पाहण्यासाठी येत आहेत.”

– शांताराम भगवान गोठवाळ (केळी उत्पादक शेतकरी, वाडे)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button