⁠हॅलो क्राईम

बांधकाम कामगाराला मोफत सुरक्षा कीट देण्यासाठी १०० रुपयांची लाच घेताना तरुणी ‘लाचलुचपत’ च्या जाळ्यात.

जळगाव : महाराष्ट्र शासनाच्या कामगार विभागांतर्गत राबविण्यात येणाऱ्या महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाच्या अत्यावश्यक संच व सुरक्षा संच वितरण योजनेत लाभार्थ्यांकडून बेकायदेशीररीत्या पैसे उकळणाऱ्या भाग्यश्री विजय पाटील (वय २०, रा. सामनेर, ता. पाचोरा, जि. जळगाव) या खाजगी महिलेविरुद्ध लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) यशस्वी सापळा कारवाई केली.

या कारवाईदरम्यान घटनास्थळावरून लाभार्थ्यांकडून कथितरित्या वसूल करण्यात आलेली एकूण २६ हजार ७७० रुपयांची रोख रक्कम जप्त करण्यात आली. यामध्ये आरोपीकडून १३ हजार ६७० रुपये आणि झेरॉक्स मशीनजवळील स्टीलच्या डब्यातून १३ हजार १०० रुपये आढळून आले.

मिळालेल्या माहितीनुसार, जळगाव येथील एका बांधकाम कामगाराने शासनाच्या योजनेअंतर्गत अत्यावश्यक संच व सुरक्षा संच मिळविण्यासाठी ३ जून २०२६ रोजी ऑनलाइन नोंदणी केली होती. त्यानुसार त्याला ४ जून रोजी वावडदा (ता. जि. जळगाव) येथे संच ताब्यात घेण्यासाठी उपस्थित राहण्याचे पत्र प्राप्त झाले होते.

तक्रारदार संच घेण्यासाठी केंद्रावर गेल्यानंतर तेथे कार्यरत असलेल्या भाग्यश्री पाटील यांनी केवायसी प्रक्रियेसाठी दोन फॉर्म खरेदी करावे लागतील, असे सांगून १०० रुपयांची मागणी केली. मात्र लाभार्थ्याला प्राप्त झालेल्या अर्जावर शासनाकडून संच विनामूल्य दिला जात असल्याचे आणि कोणत्याही प्रकारची रक्कम अथवा लाच मागितल्यास तक्रार करण्याचे स्पष्ट नमूद होते.

त्यामुळे तक्रारदाराने याबाबत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल केली. तक्रारीची पडताळणी करताना भाग्यश्री पाटील यांनी पंचांसमक्ष १०० रुपयांची मागणी केल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर एसीबीने सापळा रचला. सापळा कारवाईदरम्यान तक्रारदाराकडून १०० रुपयांची रक्कम स्वीकारताना आरोपी महिलेला रंगेहाथ पकडण्यात आले.

यानंतर करण्यात आलेल्या झडतीत घटनास्थळावरून एकूण २६ हजार ७७० रुपयांची रोख रक्कम मिळून आली. ही रक्कम लाभार्थ्यांकडून केवायसीच्या नावाखाली स्वीकारण्यात आल्याचा प्राथमिक संशय व्यक्त करण्यात येत आहे. या प्रकरणी आरोपी भाग्यश्री विजय पाटील हिच्याविरुद्ध एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने दिली.

सदर कारवाईचे पर्यवेक्षण श्री हेमंत नागरे, पोलीस निरीक्षक, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, जळगाव यांनी केले. कारवाईत पोलीस निरीक्षक रेश्मा अवतारे, सुरेश पाटील, बाळू मराठे आणि राकेश दुसाने यांचा सहभाग होता. या कारवाईस श्रीमती स्मिता नवघरे, पोलीस निरीक्षक, यांचे मार्गदर्शन लाभले.

दरम्यान, भ्रष्टाचारासंदर्भात माहिती अथवा तक्रार असल्यास नागरिकांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाशी संपर्क साधावा, असे आवाहन विभागातर्फे करण्यात आले आहे. विभागाचा टोल फ्री क्रमांक १०६४ असून व्हॉट्सॲप हेल्पलाईन ७५८८६६१०६४ उपलब्ध आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button