हॅलो जनता न्यूज, प्रतिनिधी – TCS कडून मोठा निर्णय : १२ हजारांहून अधिक कर्मचाऱ्यांना नोकरीवरून कमी केले जाणार, एआय तंत्रज्ञानाचा प्रभाव स्पष्ट
देशातील तसेच जागतिक पातळीवरील आघाडीची आयटी कंपनी टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस (TCS) ने एक धक्कादायक निर्णय घेतला आहे. कंपनीने चालू आर्थिक वर्षात १२,२६१ कर्मचाऱ्यांना नोकरीवरून कमी करण्याचा निर्णय घेतला आहे. कंपनीच्या या निर्णयामुळे अनेक मध्यम व उच्चस्तरीय कर्मचाऱ्यांना फटका बसण्याची शक्यता आहे.
टीसीएसच्या ताज्या आकडेवारीनुसार, ३० जून २०२५ पर्यंत कंपनीमध्ये ६.१३ लाख कर्मचारी कार्यरत होते. विशेष बाब म्हणजे, एप्रिल ते जून या तिमाहीत कंपनीने ५,००० नव्या कर्मचाऱ्यांची भरती केली होती. त्यामुळे नोकरी गमावणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी ही मोठी धक्का देणारी बातमी आहे.
AI News : ‘फ्यूचर रेडी ऑर्गनायझेशन’साठी दीर्घकालीन रणनीती
टीसीएसने याबाबत अधिकृत निवेदन प्रसिद्ध करून सांगितले की, ही कर्मचारी कपात कंपनीच्या दीर्घकालीन रणनीतीचा एक भाग आहे. कंपनी सध्या आर्टिफिशियल इंटेलिजेंस (AI), नवीन तंत्रज्ञान, आणि जागतिक बाजारपेठांमध्ये प्रवेश करण्यावर भर देत आहे. “नवीन तंत्रज्ञान आणि एआयच्या साहाय्याने आम्ही आमच्या सेवांचा दर्जा उंचावत आहोत. भविष्यासाठी स्वतःला आणि आमच्या ग्राहकांना सज्ज करत आहोत,” असे टीसीएसने स्पष्ट केले.
AI News : कपातीतून बाहेर झालेल्यांसाठी कंपनीतर्फे मदतीची हमी
टीसीएसने हेही स्पष्ट केले की, जे कर्मचारी या प्रक्रियेतून बाहेर होतील त्यांच्यासाठी काही मदत योजना देखील आखण्यात आल्या आहेत. त्यामध्ये –
- आर्थिक लाभ
- आऊटप्लेसमेंट सपोर्ट
- कन्सल्टिंग सेवा
- कारकीर्द मार्गदर्शन
यांचा समावेश असेल. मात्र, यामध्ये नव्याने पुन्हा नेमणूक होण्याची शक्यता अत्यल्प असल्याचे सांगण्यात आले आहे.
AI मुळे संपूर्ण आयटी क्षेत्रात मंदीचा प्रभाव
टीसीएसचा निर्णय एकट्याचा नाही. मायक्रोसॉफ्टने देखील २०२५ मध्ये आतापर्यंत १५,००० हून अधिक कर्मचाऱ्यांना कमी केलं आहे, जे त्यांच्या एकूण कर्मचारी संख्येच्या सुमारे ७% आहे. Layoffs.fyi या संकेतस्थळाच्या माहितीनुसार, २०२५ मध्ये आतापर्यंत १६९ टेक कंपन्यांमध्ये ८०,००० हून अधिक कर्मचाऱ्यांची कपात करण्यात आली आहे. २०२४ मध्ये हा आकडा १.५ लाखांवर पोहोचला होता.
AI चा दणका, कपातीमागील कारणे काय?
तज्ज्ञांच्या मते, या कपातीमागे अनेक महत्त्वाची कारणे आहेत, त्यात –
- एआयचा झपाट्याने वाढता प्रभाव
- जागतिक आर्थिक अनिश्चितता
- भू-राजकीय तणाव
- ग्राहक प्रकल्पांमध्ये होणारा विलंब
- कंपन्यांचे खर्च कमी करण्याचे धोरण
हे घटक महत्वाचे मानले जात आहेत.
टीसीएसच्या या निर्णयाने आयटी क्षेत्रात काम करणाऱ्या असंख्य कर्मचाऱ्यांमध्ये अस्वस्थता पसरली आहे. भारतातील आयटी क्षेत्रात अजूनही मंदीचे ढग असल्याचे या घटनेतून अधोरेखित होते. एकीकडे एआयसारख्या प्रगत तंत्रज्ञानाची वाटचाल सुरू असताना, दुसरीकडे यामुळे हजारो कर्मचाऱ्यांची नोकरी धोक्यात येत आहे, हे वास्तवही या निर्णयातून समोर आले आहे.
इतर महत्वाच्या बातम्या…
💥ब्रेकिंग : किडा चावल्यास तात्काळ “हा” उपाय करा, लगेच मिळेल आराम…
🚨 ब्रेकिंग : पुणे रेव्ह पार्टी प्रकरणात नवा ट्विस्ट, पतीला वाचवण्यासाठी रोहिणी खडसे रिंगणात अन्..
🌾 शेतकऱ्यांसाठी अत्यावश्यक माहिती: कीटकनाशक फवारताना घ्यावयाची काळजी…
