महाराष्ट्र दिनानिमित्त शिरपूरात विद्यार्थ्यांचा स्तुत्य सामाजिक उपक्रम.

हॅलो जनता न्यूज, शिरपूर प्रतिनिधी
शिरपूर : १ मे महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधत शिरपूर येथील आर. सी. पटेल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी महाविद्यालयाच्या प्रथम वर्षातील जळगाव विद्यार्थी संघटनेतर्फे एक सामाजिक बांधिलकी जपणारा स्तुत्य उपक्रम राबविण्यात आला. या उपक्रमांतर्गत के. वा. पुसो एन. झेड. मराठे विद्यालय संस्था, थाळनेर संचलित अनाथ व मतिमंद मुला-मुलींच्या बालगृहात विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले.
या प्रसंगी वह्या, पेन, पुस्तके आदी आवश्यक शैक्षणिक साहित्य देऊन बालगृहातील विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी प्रोत्साहित करण्यात आले. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंदाचे भाव झळकताना दिसले.
शिरपूरच्या उपनगराध्यक्षा संगीता देवरे यांच्या हस्ते शैक्षणिक साहित्याचे वितरण करण्यात आले. त्यांनी विद्यार्थ्यांशी मनमोकळा संवाद साधत शिक्षणाचे महत्त्व पटवून दिले. “परिस्थिती कशीही असली तरी शिक्षणाच्या बळावर आपण आयुष्यात यशस्वी होऊ शकतो,” असे सांगत त्यांनी विद्यार्थ्यांना आत्मविश्वासाने पुढे जाण्याचे मार्गदर्शन केले.
यावेळी प्रभारी मुख्याध्यापक निलेश पाटील तसेच शिक्षकवर्ग उपस्थित होता. या उपक्रमात संघटनेचे पदाधिकारी व सदस्यांनी उत्साहाने सहभाग घेतला. भगतसिंग नरवाडे, दुर्गेश पाटील, देवेश राणे, धर्मेश पाटील, धनंजय चौधरी, हितेश पाटील, ओम पाटील, ओम महाजन, केतन महाजन, विवेक हिवाळकर, हर्षल पाटील, पुरुषोत्तम पाटील, मयूर महाजन, सौरव पाटील, मयूर माळी, संचित महाजन, रोहित धनगर, भावेश धनगर, गिरीश सोनार, दिव्येश तेली, दर्पण कोल्हे, तनमय पाटील, दुर्गेश जंगले, तेजस मगरे, दिपक गुर्जर, वेद महाजन, श्रीकांत चौधरी यांच्यासह शिरपूर संघटनेतील चिंतन राजपूत, चिंतन गुर्जर, भावेश बोरसे, जय जाधव, ललित माळी, केतन पाटील, वैभव पाटील, धीरज महाजन, कार्तिक बोरेसे यांनी सक्रिय सहभाग नोंदविला.
जळगाव विद्यार्थी संघटना शिक्षण, आरोग्य व सामाजिक जागरूकता या क्षेत्रांत सातत्याने कार्यरत असून अशा उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांमध्ये समाजाप्रती कर्तव्यभावना दृढ होत असल्याचे मत उपस्थितांनी व्यक्त केले. महाराष्ट्र दिनाच्या निमित्ताने राबविण्यात आलेला हा उपक्रम सामाजिक ऐक्य व संवेदनशीलतेचा उत्कृष्ट नमुना ठरला.



