हॅलो सामाजिक

भडगावात  ‘नशामुक्त भारत महाअभियान’चा उत्साहात शुभारंभ ; व्यसनमुक्त समाज घडविण्याचा सामूहिक संकल्प.

हॅलो जनता प्रतिनिधी : भडगाव 

भडगाव : भारत सरकारच्या सामाजिक न्याय व अधिकारिता मंत्रालय तसेच प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्व विद्यालय, माउंट आबू यांच्या संयुक्त विद्यमाने देशभर राबविण्यात येणाऱ्या “१० कोटी नशामुक्त भारत महाअभियान” अंतर्गत भडगाव येथील ब्रह्माकुमारी सेवा केंद्रात अभियानाचा शुभारंभ उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला.

कार्यक्रमाचे उद्घाटन प्रमुख अतिथी भडगाव नगरपरिषदेचे नगरसेवक अमोल नाना पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. उद्घाटनानंतर उपस्थितांनी व्यसनमुक्त भारत घडविण्याची सामूहिक प्रतिज्ञा घेत समाजात जनजागृती करण्याचा निर्धार व्यक्त केला.

यावेळी मार्गदर्शन करताना ब्रह्माकुमारी मनीषा दीदी यांनी व्यसनमुक्त समाज निर्मितीसाठी केवळ कायदे नव्हे, तर जनजागृती, नैतिक मूल्यांचे संवर्धन आणि राजयोग ध्यानाद्वारे मानसिक बळकटी आवश्यक असल्याचे सांगितले.

या अभियानाच्या माध्यमातून संपूर्ण भडगाव तालुक्यात व्यापक जनजागृती करण्यात येणार असून शाळा, महाविद्यालये, शासकीय कार्यालये, सामाजिक संस्था तसेच विविध घटकांच्या सहकार्याने व्यसनमुक्तीविषयी विविध उपक्रम, प्रबोधन कार्यक्रम, प्रतिज्ञा अभियान आणि जनसंपर्क मोहिमा राबविण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी दिली.

कार्यक्रमास ब्रह्माकुमारी सेवा केंद्राचे बंधू-भगिनी, विविध क्षेत्रांतील मान्यवर, सामाजिक कार्यकर्ते तसेच नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचा समारोप व्यसनमुक्त, निरोगी आणि सुसंस्कृत भारत घडविण्याच्या सामूहिक संकल्पाने झाला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button