हॅलो सामाजिक

नालबंदी येथे अचानक पुराचा कहर ; शिक्षक इम्तियाज खान यांची थरारक सुटका, ग्रामस्थांच्या धाडसाने टळला मोठा अनर्थ.

भडगाव प्रतिनिधी : यशकुमार पाटील.

भडगाव : तालुक्यातील नालबंदी येथे आज सकाळी झालेल्या मुसळधार पावसामुळे अचानक पूरस्थिती निर्माण झाली. गावाजवळील के.टी. वेअर आणि परिसरातील नाल्यांना आलेल्या प्रचंड पाण्यामुळे पुराचे पाणी काही क्षणांत शाळेच्या परिसरात शिरले. या वेळी शाळेत उपस्थित असलेले शिक्षक इम्तियाज खान हे पुराच्या पाण्यात अडकले. मात्र ग्रामस्थांच्या प्रसंगावधान, धाडस आणि तत्परतेमुळे त्यांची सुखरूप सुटका करण्यात आली.

दररोजप्रमाणे सकाळी शाळेत पोहोचलेले शिक्षक इम्तियाज खान अध्यापनाची तयारी करत असतानाच अचानक पुराचे पाणी वेगाने शाळेत घुसले. पाण्याचा प्रवाह इतका तीव्र होता की, शाळेबाहेर पडण्याचा मार्ग पूर्णपणे बंद झाला. परिस्थितीचे गांभीर्य ओळखून त्यांनी स्वतःचा जीव वाचवण्यासाठी शाळेच्या गच्चीवर आश्रय घेतला.

घटनेची माहिती गावात पोहोचताच ग्रामस्थांनी कोणताही विलंब न करता घटनास्थळी धाव घेतली. जीवाची पर्वा न करता स्थानिक नागरिकांनी एकजुटीचे दर्शन घडवत अत्यंत धाडसाने बचावकार्य राबवले. अखेर शिक्षक इम्तियाज खान यांना गच्चीवरून सुरक्षित खाली आणून बाहेर काढण्यात यश आले. या शौर्यपूर्ण बचाव मोहिमेमुळे मोठा अनर्थ टळला असून गावकऱ्यांच्या धाडसाचे सर्वत्र कौतुक होत आहे.

या बचाव मोहिमेत मा. सरपंच शेख रफियोद्दीन शेख मुनीर, भगवान निकुम, समीर शेख, माजहर शेख, प्रकाश ठाकरे तसेच पोलिस पाटील सुदाम मोरसिंग राठोड, दीपक पाटील, बाळू पाटील, शिवाजी पाटील यांनी मोलाची भूमिका बजावत धाडसी कामगिरी केली.

अचानक आलेल्या पुरामुळे नालबंदी गावात काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र पुराच्या पाण्यामुळे गावातील जनजीवन विस्कळीत झाले असून नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे.

दरम्यान, स्थानिक नागरिकांनी प्रशासनाकडे गावाजवळील के.टी. वेअर व नाल्यांच्या परिसरात कायमस्वरूपी संरक्षणात्मक उपाययोजना कराव्यात, पूरपूर्व इशारा देणारी यंत्रणा उभारावी तसेच पावसाळ्यात विशेष दक्षता घ्यावी, अशी मागणी केली आहे. हवामान विभागाने पुढील काही दिवस मुसळधार पावसाचा इशारा दिल्याने नागरिकांनी नदी, नाले आणि पूरग्रस्त भागाजवळ जाणे टाळावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button