जळगावात ‘नाईट कोम्बिंग ऑपरेशन’ ; ७० बसेसची तपासणी, २० हजारांचा दंड वसूल
हॅलो जनता न्यूज – जळगाव (प्रतिनिधी) : जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था अधिक बळकट करण्यासाठी जळगाव पोलीस दलाने अवैध प्रवासी वाहतूक, अंमली पदार्थ व शस्त्रास्त्र तस्करी रोखण्यासाठी मंगळवारी मध्यरात्री विशेष ‘नाईट कोम्बिंग ऑपरेशन’ राबविले. या धडक कारवाईत तब्बल ७० खाजगी ट्रॅव्हल्स बसेसची सखोल तपासणी करण्यात आली. तसेच वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनधारकांकडून २० हजार रुपयांचा प्रलंबित दंड वसूल करण्यात आला.

जळगाव पोलीस : यांचा होता समावेश
या कारवाईत ४ आरसीपी प्लाटून्स, गुन्हे शोध पथकाच्या ४ टीम्स तसेच शहर वाहतूक शाखा आणि विविध पोलीस ठाण्यांतील अधिकारी व कर्मचारी सहभागी झाले होते. सर्व बसेसची कसून झडती घेऊन चालक व वाहकांना अवैध अंमली पदार्थ, विनापरवाना शस्त्रास्त्रे किंवा प्रतिबंधित वस्तूंची वाहतूक न करण्याच्या सूचना देण्यात आल्या.
ही संपूर्ण मोहीम पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलीस अधीक्षक कविता नेरकर आणि संदीप गावीत यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. जिल्ह्यातील शांतता आणि सुरक्षितता कायम राखण्यासाठी अशा प्रकारच्या मोहिमा यापुढेही सातत्याने राबविल्या जाणार असल्याचे पोलीस प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
इतर महत्वाच्या बातम्या…
डॉ. प्राजक्ता देशमुख व डॉ. शारदा शिरोळे लिखित ‘कचरा व्यवस्थापन’ या पुस्तकाचे प्रकाशन
महाराष्ट्र दिनानिमित्त शिरपूरात विद्यार्थ्यांचा स्तुत्य सामाजिक उपक्रम.




