Saif Ali Khan Attack : सैफवर हल्ला करणारा आरोपी मुंबई सोडून गेला का? ; 3 दिवसांनंतरही हल्लेखोराचा शोध लागेना

हॅलो जनता न्युज, मुंबई :
अभिनेता सैफ अली खान (Saif Ali Khan Attack) यांच्या घरात चोरी करण्याच्या उद्देशाने घुसलेल्या आरोपीने त्यांच्यावर जीवघेणा हल्ला केला. बुधवारी मध्यरात्री घडलेल्या या हल्ल्यानंतर तीन दिवस उलटून गेले असले तरी आरोपी अजूनही पोलिसांच्या ताब्यात आलेला नाही. या प्रकरणात एक नवी माहिती समोर आली आहे, ज्यावरून पोलिसांना असा संशय आहे की हल्लेखोर लोकल किंवा एक्सप्रेस गाडीने मुंबईच्या बाहेर गेला असावा. पोलिसांची विविध पथके लोकल आणि एक्सप्रेस रेल्वे स्थानकांवरील सीसीटीव्ही फुटेज तपासत आहेत.
पोलीस सूत्रांनुसार, हल्ला करणारा आरोपी सराईत गुन्हेगार असल्याचं दिसत नाही. आतापर्यंत पोलिसांना त्याचा कोणताही गुन्हेगारी रेकॉर्ड सापडलेला नाही, तसेच त्याच्या कुटुंबीयांची किंवा मित्रांचीही माहिती पोलिसांना मिळालेली नाही. याप्रकरणी 48 तास उलटून गेल्यानंतरही आरोपीचा शोध लागलेला नाही. तांत्रिक नेटवर्ककडून पोलिसांना अद्याप कोणतीही मदत मिळालेली नाही, त्यामुळे आता पोलिस एक्सपर्ट्सची मदत घेत आहेत.
दरम्यान, आणखी एक माहिती समोर आली आहे की, सैफ अली खानवर (Saif Ali Khan Attack) हल्ला करणाऱ्या आरोपीने त्याच्या कपड्यांचा गेटअप बदलला होता, ज्यामुळे त्याला पकडण्यास पोलिसांना अडचणी आल्या. सैफच्या घरात आणि वांद्र्यातील लकी हॉटेलमधील सीसीटीव्ही फुटेजवरून हे समोर आलं की, हल्ल्यानंतर आरोपीने आपला गेटअप बदलला आणि त्याने पकडले जाऊ नये यासाठी प्रयत्न केले. हल्ल्यानंतर तो सकाळी आठ वाजेपर्यंत वांद्र्यातच फिरत होता, तरीही पोलिसांना त्याला पकडण्यात यश आलेलं नाही.
आरोपीच्या कपडे बदलण्याच्या पद्धतीवरून असं दिसतं की त्याला क्राइम वेबसिरीज किंवा क्राइम फिल्म्सचा प्रभाव असावा. पोलिसांनी आरोपीच्या कुटुंबीयांचा आणि मित्रांचा माग काढला असला तरी त्यांना यश आलेलं नाही. सध्या मुंबई पोलिस आणि गुन्हे शाखेच्या 30 पथकांचा शोध सुरू आहे. रोज नवे फोटो आणि सीसीटीव्ही फुटेज मिळत असतानाही आरोपी अजूनही फरार आहे, आणि त्याचा कुठेही मागमूस लागलेला नाही.
Pune Accident : पुणे जिल्ह्यात दोन भीषण अपघात, १२ जणांचा मृत्यू, अनेक जण जखमी
Saif Ali Khan Attack : सैफ अली खानवर चाकू हल्ला, बॉलिवूडमध्ये धक्का