Jitendra Awahad : वाल्मिक कराडप्रकरणावरून जितेंद्र आव्हाडांचा खळबळजनक दावा
हॅलो जनता न्युज, मुंबई :
बीडच्या मस्साजोग गावच्या सरपंच संतोष देशमुख हत्याप्रकरणातील अटकेत असलेला वाल्मिक कराड दोन दिवसांपूर्वी पोलिसांना शरण गेला. त्यावेळी तो ज्या गाडीतून पोलिसांपाशी पोहोचला, ती गाडी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या ताफ्यातील होती, असा आरोप बीडचे खासदार बजरंग सोनावणे यांनी केला होता. या आरोपावर आता राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड (Jitendra Awahad) यांनी चांगलीच प्रतिक्रिया दिली आहे आणि खळबळजनक दावे केले आहेत.
आव्हाड (Jitendra Awahad) यांनी एक्सवर एक पोस्ट करत म्हटले, “ज्या गाडीतून वाल्मिक अण्णा कराड सीआयडी ऑफिसच्या दारात उतरले, आणि ताठ मानेने आत गेले, ती गाडी बीडचे खासदार बजरंग सोनावणे यांनी उघड केलेले गुपीत आहे. या गाडीचे संबंध अजितदादा पवार यांच्याशी आहेत. ते मस्साजोगमध्ये गेले होते, तेव्हा ही गाडी त्यांच्या ताफ्यात होती. हे प्रकरण आता इतके किचकट आणि किळसवाणे व्हायला लागले आहे की, सामान्य माणसांना राजकीय माणसांबद्दल शिसारी निर्माण होईल. अजितदादा पवार यांची प्रतिमा अशी आहे की ते काहीच खपवून घेत नाहीत, मग त्यांना हे कशा काय खपते?” असा सवाल त्यांनी उपस्थित केला.
याच पोस्टमध्ये त्यांनी पुढे असे लिहिले, “आज मला जे कळले ते आणखी धक्कादायक होते. पूर्ण पोलीस बंदोबस्तात एक गाडी आत गेली. त्या गाडीतून उतरलेला एक इसम पोलिस ठाण्यात गेला आणि महिला कर्मचाऱ्यांशी भांडू लागला. त्याचे नाव बालाजी तांदळे आहे. तो एका गावाचा सरपंच आहे. आणि तरीही दोन पत्रकारांनी मला सांगितले की, ‘आम्ही बीड आणि परळीपासून बाहेर निघून जाऊ इच्छित आहोत, कारण काही इसम सातत्याने आमच्या मागे लागले आहेत.’”
आव्हाड यांनी यापूर्वीच एक पोस्ट केली होती, ज्यात त्यांनी वाल्मिक कराड प्रकरणी संशय व्यक्त केला होता. “सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार, जर एखाद्या महत्वाच्या गुन्हेगाराला न्यायालयात हजर करायचं असेल, तर त्याला व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे देखील हजर करता येऊ शकतो. वाल्मिक कराडला केजला नेण्यात आले, आणि लोकांना हे आधीच माहीत होतं की तो पुण्यात सरेंडर होणार आहे. म्हणून पुणे आणि केज मध्ये अराजकता माजवण्यासाठी हजारो लोक तयार होते. मुंबईच्या गँगवॉरमध्येही इतकी अराजकता कधी माजवली गेली असेल, असं मला वाटत नाही,” असं ते म्हणाले.
“मला बीडमधील लोकांना आठवण करून द्यायचं आहे की, मुंबईत अंडरवर्ल्ड आणि गँगवॉर संपवणारा एक नाव स्वर्गीय गोपीनाथ मुंडे यांचं आहे. गँगवॉर संपवणारा गोपीनाथ मुंडे यांचा बीड आता दहशत आणि गँगवॉरच्या तयारीच्या गडद मार्गावर जात आहे. अजित पवार यांच्या ताफ्यातील जी गाडी आरोपीच्या पोलीस तपासासाठी वापरली गेली, तीच गाडी केवळ राजकीय गुंडगिरी दर्शवते आणि महाराष्ट्राच्या भविष्यावर गंभीर प्रश्न उपस्थित करते,” असे आव्हाड यांनी सांगितले.
Jitendra Awahad : ते आम्हाला उत्तर द्यायला हवे…
आव्हाड यांनी पोलिसांची कार्यपद्धती आणि प्रतिमेसाठीही चिंता व्यक्त केली. “जे पोलिसांचे घोषवाक्य ‘सद्रक्षणाय खलनिग्रहणाय’ आहे, ते आता राजकीय गुंडगिरीमुळे ‘खलरक्षणाय सद्रनिग्रहणाय’ बनले आहे का?” असा सवाल त्यांनी केला. “महाराष्ट्र आता बिहार किंवा आफ्रिकेतील पीटरमारिट्झबर्ग शहराच्या पातळीवर पोहोचला आहे. या प्रकारांमुळे महाराष्ट्र पोलिसांचे काय उत्तर आहे? ते आम्हाला उत्तर द्यायला हवे,” असे आव्हाड यांनी शेवटी व्यक्त केले. जितेंद्र आव्हाड यांनी या प्रकरणात अनेक गंभीर मुद्दे उचलून धरले असून, पोलिसांची भूमिका, राज्य सरकारची भूमिका आणि राजकीय गुंडगिरीच्या आरोपांवर त्यांची तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.
Santosh Deshmukh Case : मी राजीनामा देण्याची गरज नाही – धनंजय मुंडे
Santosh Deshmukh : बीडमध्ये सरपंच संतोष देशमुख हत्येची गुऱ्हाळ; तपासासाठी स्थापन केली एसआयटी
Jalgaon MIDC : चटई कंपनीला लागलेल्या आगीत 100 टनापेक्षा जास्त प्लास्टिक साहित्य खाक