‘विकसित भारतासाठी – नशामुक्त युवा’ जिल्हास्तरीय स्पर्धांचे आयोजन; २५ जुलैपर्यंत अर्ज, युवकांना सहभागाचे आवाहन.

जळगाव : युवा व्यवहार व क्रीडा मंत्रालय, भारत सरकारच्या मेरा युवा भारत (MY Bharat), जळगाव यांच्या वतीने ‘विकसित भारतासाठी – नशामुक्त युवा’ या संकल्पनेवर आधारित विविध जिल्हास्तरीय स्पर्धांचे आयोजन करण्यात आले असून, जिल्ह्यातील १५ ते २९ वर्षे वयोगटातील युवक-युवतींनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हा युवा अधिकारी यांनी केले आहे.
युवकांमध्ये व्यसनमुक्तीबाबत जनजागृती निर्माण करणे, त्यांच्या कलागुणांना आणि सर्जनशीलतेला व्यासपीठ उपलब्ध करून देणे तसेच विकसित भारत २०४७ या राष्ट्रीय संकल्पनेत युवकांचा सक्रिय सहभाग वाढविणे, हा या उपक्रमामागील प्रमुख उद्देश आहे.
या स्पर्धांमध्ये जळगाव जिल्ह्यातील युवक-युवती तसेच जिल्ह्यातील शैक्षणिक संस्थांमध्ये शिक्षण घेणारे विद्यार्थी सहभागी होऊ शकतात. संगीत, नृत्य, नुक्कड नाटक (पथनाट्य), रील/शॉर्ट फिल्म, स्लॅम पोएट्री (काव्य सादरीकरण), चित्रकला, वादविवाद आणि घोषवाक्य लेखन अशा विविध प्रकारच्या स्पर्धा आयोजित करण्यात आल्या आहेत. स्पर्धा मराठी, हिंदी किंवा इंग्रजी भाषेत होणार असून सर्व सादरीकरणे मौलिक, सकारात्मक आणि व्यसनमुक्तीचा प्रभावी संदेश देणारी असावीत.
जिल्हास्तरीय स्पर्धेतील विजेत्यांना राज्यस्तरीय स्पर्धेत प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळणार आहे. त्यानंतर राज्यस्तरीय विजेत्यांची निवड स्वातंत्र्यदिनानिमित्त नवी दिल्ली येथे होणाऱ्या राष्ट्रीय कार्यक्रमासाठी करण्यात येणार असल्याने या स्पर्धांना विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.
स्पर्धेत सहभागी होण्यासाठी इच्छुकांनी www.mybharat.gov.in या MY Bharat पोर्टलवर ऑनलाइन नोंदणी करून अर्ज करावा. अर्ज करण्याची अंतिम मुदत २५ जुलै २०२६ आहे.
अधिक माहितीसाठी श्री. कमलेश सोनवणे (मो. 9960842369) किंवा श्री. अभिषेक चवरे, जिल्हा युवा अधिकारी, मेरा युवा भारत, जळगाव (मो. 8779686660) यांच्याशी संपर्क साधावा.
जिल्हा युवा अधिकारी यांनी जिल्ह्यातील सर्व महाविद्यालये, शाळा, युवक मंडळे, राष्ट्रीय सेवा योजना (NSS), राष्ट्रीय छात्र सेना (NCC) तसेच पात्र युवक-युवतींनी या स्पर्धांमध्ये उत्स्फूर्त सहभाग नोंदवून व्यसनमुक्त भारत आणि विकसित भारत २०४७ या राष्ट्रीय अभियानाला बळकटी द्यावी, असे आवाहन केले आहे.



