आण्णाभाऊ साठे यांची १०६ वी जयंती प्रबोधनातून साजरी.

लहुजी क्रांती मोर्चा व भारत मुक्ती मोर्चाच्या वतीने आयोजन; शाहिरीने कार्यक्रमाची सुरुवात
भडगाव : लहुजी क्रांती मोर्चा व भारत मुक्ती मोर्चाच्या वतीने लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची १०६ वी जयंती प्रबोधनात्मक कार्यक्रमाच्या माध्यमातून उत्साहात साजरी करण्यात आली. कार्यक्रमाच्या सुरुवातीला परशुराम सूर्यवंशी व त्यांच्या सहकाऱ्यांनी पहाडी आवाजातील प्रभावी शाहिरी सादर करून उपस्थितांची मने जिंकली.
यावेळी योगीराज पाटील, प्रा. तांदळे, रवी अहिरे, रवी चव्हाण, सुभाष पगारे, शामराव खैरनार, संजय सोनार, राजू महाले आणि धनराज बोरसे यांनी मनोगत व्यक्त केले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शुद्धोधन खंडारे होते. अध्यक्षीय मनोगतात त्यांनी अण्णाभाऊ साठे यांनी स्वातंत्र्याबाबत उपस्थित केलेल्या प्रश्नांचा संदर्भ देत आजच्या सामाजिक व शैक्षणिक परिस्थितीवर भाष्य केले. पेपर लीक, शाळा बंद होणे, रोजगाराच्या संधी कमी होणे, आरक्षणाच्या प्रश्नांपासून मागच्या दाराने होणाऱ्या भरतीपर्यंत विविध विषयांवर त्यांनी परखड आणि ज्वलंत मांडणी केली. कठोर मेहनत करणाऱ्या विद्यार्थ्यांना न्याय मिळत नसल्याची खंतही त्यांनी व्यक्त केली.
कार्यक्रमाला महिलांची विशेष उपस्थिती होती. अण्णाभाऊ साठे यांच्या विचारांचा आणि सामाजिक परिवर्तनाच्या लढ्याचा वारसा पुढे नेण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विक्रम सोनवणे यांनी केले. लहुजी क्रांती मोर्चाचे जिल्हाध्यक्ष भगवान शिंदे यांनी प्रास्ताविक केले, तर देविदास राठोड यांनी आभार मानले.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी योगेश जाधव, जवाहर चव्हाण, सुधीर अहिरे, सिताराम चव्हाण, लाला भिल, जगदीश बोरसे, प्रकाश कोतकर, भावेश पाटील, भूषण शिंदे, हेमंत पाटील, अजय सूर्यवंशी, नाना सोनवणे, विनोद पगारे, सुभाष पगारे, रवी थोरात आणि सुनील महाजन यांच्यासह कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले.



