ब्रेकिंग : एकनाथ शिंदे घेणार उपमुख्यमंत्रीपद, त्यासोबत मिळणार “ही” महत्वाची खाती…
हॅलो जनता न्युज, मुंबई
एकनाथ शिंदे हे महायुतीच्या नवीन मंत्रिमंडळात उपमुख्यमंत्रिपद स्वीकारणार असल्याची माहिती अत्यंत खात्रीलायक सूत्रांनी दिली. शिंदेसेनेच्या एका नेत्याने दिलेल्या माहितीनुसार एकनाथ शिंदे यांनी याबाबत पक्षाच्या आमदारांनी केलेला आग्रह त्यांनी मान्य केला आहे.
भाजपच्या नेतृत्वातील महायुती सरकारचा शपथविधी दि. ५ डिसेंबरला होत असताना शिंदे उपमुख्यमंत्रिपद स्वीकारणार का? याविषयी पाच दिवसांपासून उलटसुलट चर्चा होती. शिंदे उपमुख्यमंत्री होतील पण त्यांना गृहमंत्रिपद द्यायला हवे, अशी मागणी शिंदेसेनेकडून करण्यात आली होती. माजी मंत्री गुलाबराव पाटील, आमदार संजय शिरसाट यांनी जाहीरपणे तशी मागणी केली होती.
मात्र, विश्वसनीय सूत्रांनी सांगितले की गृहमंत्रिपद हे मुख्यमंत्र्यांकडेच राहावे, असा भाजपचा आग्रह आहे. तो मान्य करत शिंदे यांना नगरविकास आणि आणखी एक महत्त्वाचे (जसे एमएसआरडीसी) द्यावे, असा नवीन पर्याय समोर आला. त्यावर दोन्ही पक्ष राजी होतील असे सूत्रांनी सांगितले. मुख्यमंत्र्यांसह मंत्रिमंडळात दोन उपमुख्यमंत्री असतील असे अजित पवार यांनी चार दिवसांपूर्वीच म्हटले होते. त्यानुसार आता ते आणि शिंदे उपमुख्यमंत्री असणार आहेत.
एकनाथ शिंदे मंत्रिमंडळात हवेच, शिंदे सेनेच्या नेत्यांनी घातली गळ
शिंदे यांच्याऐवजी त्यांचे पुत्र खासदार डॉ. श्रीकांत शिंदे किंवा शिंदेंचे विश्वासू दादा भुसे उपमुख्यमंत्री होतील अशी चर्चा होती. शिंदेसेनेच्या ज्येष्ठ आमदाराने सांगितले की, स्वतः एकनाथ शिंदे मंत्रिमंडळात असलेच पाहिजेत, अशी आमची भूमिका आहे. मी सरकारमध्ये न राहता पक्षाचे काम पाहतो, असे शिंदे आम्हाला सांगत होते; पण आम्ही स्पष्टपणे सांगितले की तुम्ही असाल तरच आपले आमदार मंत्रिमंडळात असतील. शिंदे हेच आमचे नेते आहेत आणि ते मंत्रिमंडळात नसतील याची आम्ही कल्पनादेखील करू शकत नसल्याने एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री होतील हे जवळपास निश्चित झाले आहे.
इतर महत्वाच्या बातम्या
सावधान ! मेडिकल चालकाला सहा लाखांचा गंडा, Jalgaon Cyber police ठाण्यात गुन्हा दाखल..
Mahayuti sarkar : महायुतीचा मंत्रिपदाचा फॉर्म्युला ठरला, कोणत्या पक्षाला मिळणार किती मंत्रिपदे…