Mount Everest : या ठरल्या माऊंट एवरेस्ट शिखर सर करणाऱ्या पहिल्या महिला पोलीस अधिकारी
हॅलो जनता (नाशिक) – 50 वर्षीय द्वारका यांनी माऊंट एव्हरेस्ट (Mount Everest )सर करण्याचा विक्रम केला आहे. त्या महाराष्ट्र पोलीस दलातील त्या पहिल्याच महिला ठरल्या आहेत. त्यांच्या विक्रमाचं सर्वत्र कौतुक होत आहे. तर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील त्यांच्या या धाडसाचे कौतुक करत पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.
एका महिला पोलीस अधिकाऱ्याने वयाच्या 50 व्या वर्षी जगातील माऊंट एव्हरेस्ट सर करण्याचा विक्रम केला आहे. मूळच्या अहमदनगर जिल्ह्यातील श्रीरामपूरच्या आणि सध्या नाशिक पोलीस दलात पोलीस निरीक्षक पदावर कार्यरत असलेल्या द्वारका डोखे यांनी हा विक्रम केला आहे. द्वारका या महाराष्ट्र पोलीस दलातील त्या पहिल्याच महिला ठरल्या आहेत.
द्वारका या माऊंट एवरेस्टवर (Mount Everest) पोहोचल्यानंतर त्यांनी भारताचा ध्वज हातात घेत राष्ट्रगीत म्हटलं. त्याचबरोबर त्यांनी महाराष्ट्र पोलीस दलाच्या ध्वजाला मानवंदना दिली. त्यानंतर दिवगंत आई वडिलांचा फोटो झळकवत त्यांना श्रद्धांजली अर्पण केली. द्वारका यांच्या वाचनात “साद देती हिम शिखरे” हे पुस्तक आलं. त्यानंतर त्यांना बर्फाच्छादित असलेला माऊंट एवरेस्ट डोंगर सर करण्याचे आकर्षण वाटू लागलं. यासाठी त्यांनी अनेक छोटे डोंगर सर केले. मात्र माऊंट एव्हरेस्ट सर करण्याच्या ध्येयाने त्यांना पछाडले होते. त्यासाठी त्यांनी मेहनत घ्यायला सुरुवात केली. पुढे त्यांनी 30 मार्च 2024 रोजी माऊंट एव्हरेस्ट चढायला सुरुवात केली. त्या 22 मे रोजी म्हणजेच साधारण 50 दिवसांच्या प्रयत्नात माऊंट एव्हरेस्टच्या शिखरावर पोहचल्या.
सर्वोच्च शिखरावर पोहोचलेल्या द्वारक यांनी या विक्रमावर भावुक प्रतक्रिया दिली. ‘हा क्षण माझ्या आयुष्यातील सर्वात भावुक करणारा क्षण होता, अशी प्रतिक्रिया द्वारका यांनी दिली. द्वारका यांनी एमपीएससी परीक्षेत यश मिळवल्यानंतर २००६ साली महाराष्ट्र पोलीस दलात पोलीस उपनिरीक्षक म्हणून रुजू झाल्या. द्वारका यांचं वय ५० वर्षे आहे. द्वारका अविवाहित असल्या तरी त्यांना नोकरीसोबत त्यांचे ध्येय गाठण्यासाठी अथक मेहनत घेतली.
तसेच त्यांनी कुटुंबाची साथ मिळाली. वरिष्ठांकडून मिळालेल्या प्रोत्साहनामुळे त्या मोठ्या विक्रमला गवसणी घालू शकल्या. या विक्रमानंतर श्रीरामपूर शहरात त्यांची वाजत गाजत मिरवणूक काढण्यात आली. या विक्रमानंतर सर्वच स्तरातून द्वारका यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होतोय. या विक्रमानंतर त्यांनी प्रत्येकाने आपल्या आयुष्यातील सर्वोच्च शिखर गाठण्यासाठी अथक परिश्रम करावेत, असा संदेश त्यांनी दिला आहे.