Kumbhamela 2025 : कुंभमेळ्याची भव्य सुरुवात; आजपासून प्रयागराजमध्ये शाही स्नानांची धूम
हॅलो जनता न्युज, जळगाव :
जगातील सर्वात मोठा धार्मिक महोत्सव म्हणून ओळखला जाणारा कुंभमेळा (Kumbhamela 2025) आज, सोमवार (१३ जानेवारी) पासून सुरू होणार आहे. उत्तरप्रदेशातील प्रयागराज येथील गंगा, यमुना आणि सरस्वती या नद्यांच्या संगमावर आज पौष पौर्णिमेनिमित्त पहिले शाही स्नान होईल. सोमवारी १३ जानेवारी ते बुधवार २६ फेब्रुवारी, या कालावधीत तब्बल ४५ दिवस महाकुंभ मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. यासाठी महाकुंभ मेळाव्याची जय्यत तयारी करण्यात आली असून, प्रयागराजमध्ये आजपासून या दिमाखदार महोत्सवाची सुरुवात झाली आहे. या महाकुंभसाठी साधू-संत आणि भाविक आधीच प्रयागराजमध्ये दाखल झाले आहेत.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या ट्विटर अकाउंटवर कुंभमेळ्याच्या (Kumbhamela 2025) शुभारंभाबद्दल ट्वीट करत शुभेच्छा दिल्या आहेत. “भारतीय मूल्ये आणि संस्कृती जपणाऱ्या कोट्यवधी लोकांसाठी हा एक अत्यंत खास दिवस आहे. प्रयागराजमध्ये महाकुंभ सुरू होत आहे. हा महाकुंभ असंख्य लोकांना श्रद्धा, भक्ती आणि संस्कृतीच्या पवित्र संगमात एकत्र आणतो. हा महाकुंभ भारताच्या आध्यात्मिक वारशाचे प्रतीक आहे,” असे पंतप्रधान मोदी यांनी ट्वीटमध्ये म्हटले आहे.
या महाकुंभ मेळाव्यासाठी (Kumbhamela 2025) सुरक्षेची विशेष व्यवस्था करण्यात आली आहे. प्रयागराजमध्ये 45,000 पोलीस कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत. यासोबतच साधू-संत, भाविक आणि परदेशी व्यक्तींच्या उपस्थितीमुळे 55 हून अधिक सुरक्षा फोर्सेसही यावर्षी तैनात असतील. महाकुंभच्या व्यवस्थापनासाठी २,७५० पेक्षा अधिक सीसीटीव्ही कॅमेरे आणि ४० कोटी भाविकांच्या हालचालींवर लक्ष ठेवण्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्तेच्या सहाय्याने २६८ व्हिडीओ कॅमेरे तैनात करण्यात आले आहेत. वाहतूक व्यवस्थापन आणि पार्किंगसाठी २४० AI-आधारित प्रणालीही कार्यरत असतील.
महाकुंभ मेळाव्यात एकूण सहा शाही स्नान होणार आहेत. यातील पहिले शाही स्नान आज, १३ जानेवारी रोजी पार पडेल. दुसरे शाही स्नान १४ जानेवारी २०२५ रोजी मकर संक्रांतीच्या दिवशी होईल. तिसरे स्नान २९ जानेवारी २०२५ रोजी मौनी अमावस्यादिवशी, चौथे स्नान २ फेब्रुवारी २०२५ रोजी वसंत पंचमी दिवशी, पाचवे शाही स्नान १२ फेब्रुवारी २०२५ रोजी माघ पौर्णिमा दिवशी आणि शेवटचे शाही स्नान २६ फेब्रुवारी २०२५ रोजी महाशिवरात्री दिवशी होईल.
कवियत्री बहिणाबाई चौधरी शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, जळगाव येथे राष्ट्रीय युवा दिन साजरा