हॅलो सामाजिक

राजर्षी शाहू महाराज जयंती उत्साहात साजरी; सामाजिक न्याय व समतेचा विचार जोपासण्याचा निर्धार.

भडगाव : राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त भडगाव येथील पारोळा रोडवरील विश्रामगृहात अभिवादन व प्रबोधनपर कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला. सामाजिक समता, शिक्षण, स्त्रीसक्षमीकरण आणि सामाजिक न्याय यांचा संदेश देणाऱ्या शाहू महाराजांच्या कार्याचा जागर करून त्यांच्या विचारांचा वारसा पुढील पिढीपर्यंत पोहोचविण्याचा निर्धार यावेळी उपस्थितांनी व्यक्त केला.

कार्यक्रमाच्या प्रारंभी सेवानिवृत्त राज्य परिवहन अधिकारी डी. के. वाल्हे यांच्या हस्ते राजर्षी छत्रपती शाहू महाराजांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. त्यानंतर उपस्थितांनी शाहू महाराजांच्या कार्याला कृतज्ञतापूर्वक अभिवादन केले.

यावेळी प्रमुख वक्ते प्रा. डॉ. अतुल देशमुख यांनी राजर्षी शाहू महाराजांच्या जीवनकार्याचा सविस्तर आढावा घेताना सांगितले की, “सामाजिक समतेचा पाया मजबूत करण्याचे ऐतिहासिक कार्य शाहू महाराजांनी केले. शिक्षण सर्वसामान्यांपर्यंत पोहोचविणे, स्त्रियांच्या हक्कांसाठी लढा देणे, मागासवर्गीयांना आरक्षणाच्या माध्यमातून न्याय देणे आणि सामाजिक विषमता दूर करण्यासाठी त्यांनी घेतलेले निर्णय आजही मार्गदर्शक आहेत.”

ते पुढे म्हणाले की, “राजर्षी शाहू महाराजांसारख्या महामानवांनी रुजविलेल्या सामाजिक न्यायाच्या विचारांचे गोड फळ आज संपूर्ण समाज चाखत आहे. त्यामुळे त्यांच्या कार्याचे स्मरण करणे आणि त्यांचे विचार समाजात रुजविणे हे प्रत्येक जागरूक नागरिकाचे कर्तव्य आहे.”

कार्यक्रमात सामाजिक परिवर्तनासाठी महापुरुषांनी दिलेल्या योगदानाचा गौरव करण्यात आला. तसेच समाजात समता, बंधुता आणि शिक्षणाचा प्रसार करण्यासाठी प्रत्येकाने पुढाकार घेण्याचे आवाहन करण्यात आले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन रवींद्र पाटील यांनी केले. यावेळी उपस्थितांनी भविष्यात सर्व महापुरुषांच्या जयंती केवळ औपचारिक न साजऱ्या करता जनजागृती, सामाजिक प्रबोधन आणि विधायक उपक्रमांच्या माध्यमातून साजऱ्या करण्याचा संकल्प केला.

या कार्यक्रमास यशराज निकम, गणेश देशमुख, प्रा. डॉ. दिनेश तांदळे, प्रा. डॉ. बी. एस. भालेराव, जुलाल सोनवणे, पारस देशमुख, विकास भोसले, रवींद्र जाधव, विक्रम सोनवणे, जी. डी. बाविस्कर, प्रा. डॉ. गजानन चौधरी, अशोक देशमुख, तुषार देशमुख, भूषण भोसले यांच्यासह विविध सामाजिक संघटनांचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

राजर्षी शाहू महाराजांच्या जयंतीनिमित्त भडगावात अभिवादन व प्रबोधनपर कार्यक्रम. डी. के. वाल्हे यांच्या हस्ते प्रतिमेस पुष्पहार अर्पण. प्रा. डॉ. अतुल देशमुख यांचे सामाजिक न्याय, समता व शिक्षणावर मार्गदर्शन. शाहू महाराजांच्या विचारांचा वारसा पुढील पिढीपर्यंत पोहोचविण्याचा निर्धार. महापुरुषांच्या जयंती जनजागृती व सामाजिक उपक्रमांच्या माध्यमातून साजऱ्या करण्याचा संकल्प यावेळी उपस्थित यांनी व्यक्त केला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button