भडगाव येथे हमीभाव ज्वारी-मका खरेदीचा शुभारंभ; शेतकऱ्यांनी योजनेचा लाभ घ्यावा : आ. किशोर पाटील.

हॅलो जनता प्रतिनिधी : यशकुमार पाटील
भडगाव, : किमान आधारभूत किंमत (एमएसपी) खरेदी योजनेअंतर्गत रब्बी हंगाम २०२५-२६ मधील ज्वारी व मका खरेदी केंद्राचे काटापूजन शनिवारी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सब मार्केट, भडगाव येथे उत्साहात पार पडले. भडगाव-पाचोरा मतदारसंघाचे आमदार किशोरआप्पा पाटील यांच्या हस्ते काटापूजन करून खरेदी प्रक्रियेचा शुभारंभ करण्यात आला.
यावेळी संघाचे चेअरमन राजेंद्र लालचंद परदेशी यांनी आमदार किशोरआप्पा पाटील यांचा सत्कार केला. तसेच तहसीलदार शीतल सोलाट यांचा सत्कार संघाच्या संचालिका सौ. योजनाताई दत्तात्रय पाटील यांच्या हस्ते करण्यात आला.
कार्यक्रमास संघाचे संचालक भैयासाहेब पाटील, जयवंत पाटील, खुमानसिंग पाटील, रायचंद परदेशी, प्रभाकर पाटील, अमोल पाटील, गुलाब पाटील, भीमराव पाटील, नागेश वाघ, माजी चेअरमन नगराज पाटील, माजी संचालक राजेंद्र परदेशी, उपनगराध्यक्ष राजेंद्र महादू पाटील, नगरसेवक युवराज आबा पाटील, गटनेते लखीचंद पाटील, शशीकांत वाणी, आबा चौधरी, पिंटू मराठे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती गणेश पाटील, उपसभापती पी. ए. पाटील, प्रभारी पुरवठा निरीक्षण अधिकारी अनिल भामरे, प्रभारी पुरवठा निरीक्षक हर्षल भदाणे, लिपिक समाधान पाटील, संघाचे व्यवस्थापक सुरेश पाटील, ग्रेडर दिलीप नरवाडे, क्लार्क साहेबराव पाटील, रमेश पाटील, विशाल भोई, अनिल पाटील, तुषार पाटील, हमाल मुकादम प्रकाश बाविस्कर यांच्यासह मोठ्या संख्येने शेतकरी उपस्थित होते.
यावेळी प्रथम ज्वारी विक्री करणारे शेतकरी बापूराव पाटील व अरुण पाटील यांचा आमदार किशोरआप्पा पाटील यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
संघाकडे ज्वारीसाठी १,८१८ तर मक्यासाठी १६४ शेतकऱ्यांनी ऑनलाइन नोंदणी केली आहे. ३० जून २०२६ अखेर संघामार्फत ६,९८०.५० क्विंटल ज्वारी व ६०८ क्विंटल मका खरेदी करण्यात आला आहे. यंदा ज्वारीचा हमीभाव ३,६९९ रुपये प्रति क्विंटल, तर मक्याचा २,४०० रुपये प्रति क्विंटल निश्चित करण्यात आला आहे.
खरेदीसाठी शासनाने ३१ जुलै २०२६ पर्यंत मुदतवाढ दिली असून, ज्वारी खरेदीचे उद्दिष्ट वाढवून द्यावे, अशी मागणी संचालक मंडळाने केली आहे. तालुक्यातील जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी हमीभाव खरेदी योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन संघाचे चेअरमन राजेंद्र लालचंद परदेशी व संचालक मंडळाने केले.



