⁠हॅलो क्राईम

जळगाव वाहतूक शाखेची विशेष मोहीम, २७१ वाहनचालकांवर कारवाई‌ ; २.०२ लाखांचा दंड वसूल

जळगाव,  : जिल्ह्यात शिस्तबद्ध वाहतूक व्यवस्था निर्माण करण्याच्या उद्देशाने जळगाव शहर वाहतूक शाखेकडून विशेष वाहतूक अंमलबजावणी मोहीम राबविण्यात आली. पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडलेल्या या मोहिमेत वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनचालकांवर कठोर कारवाई करण्यात आली.

या विशेष मोहिमेदरम्यान एकूण २७१ वाहनचालकांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली असून त्यांच्याकडून २ लाख २ हजार ३०० रुपये दंड वसूल करण्यात आला. हेल्मेटचा वापर न करणे, सीटबेल्ट न लावणे, सिग्नलचे उल्लंघन करणे, विनापरवाना वाहन चालविणे तसेच इतर वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर ही कारवाई करण्यात आली.

जिल्ह्यात वाढत्या वाहनसंख्येमुळे होणारे अपघात कमी करण्यासाठी तसेच नागरिकांमध्ये वाहतूक नियमांविषयी जनजागृती निर्माण करण्यासाठी पोलीस प्रशासन विविध उपक्रम राबवत आहे. या पार्श्वभूमीवर पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी नागरिकांना वाहतूक नियमांचे काटेकोर पालन करण्याचे आवाहन केले आहे.

“वाहतूक नियमांचे पालन करणे ही प्रत्येक नागरिकाची जबाबदारी आहे. हेल्मेट व सीटबेल्टचा नियमित वापर, वेगमर्यादेचे पालन आणि वाहन चालविताना मोबाईलचा वापर टाळल्यास अनेक अपघात टाळता येऊ शकतात. सुरक्षित प्रवासासाठी नागरिकांनी नियमांचे पालन करावे,” असे आवाहन त्यांनी केले.

ही विशेष वाहतूक मोहीम पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलीस अधीक्षक संदीप गावित, उपविभागीय पोलीस अधिकारी नितीन गवाणे यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच शहर वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक संजय गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली राबविण्यात आली. वाहतूक शाखेतील अधिकारी व अंमलदारांनी या मोहिमेत सक्रिय सहभाग नोंदवून कारवाई यशस्वी केली.

वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर यापुढेही कठोर कारवाई सुरू राहणार असल्याचा इशारा पोलीस प्रशासनाने दिला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button