पाचोरा : एम. एम. महाविद्यालयाचे प्रा. वासुदेव वले यांचा वाढदिवसानिमित्त स्तुत्य निर्णय, मरणोत्तर देहदानाचा संकल्प.

हॅलो जनता न्यूज, पाचोरा – येथील एम. एम. महाविद्यालयाचे उपप्राचार्य व मराठी विभाग प्रमुख प्रा. वासुदेव वले यांनी आपल्या ५७ व्या वाढदिवसानिमित्त समाजाला प्रेरणादायी असा स्तुत्य निर्णय घेतला आहे. त्यांनी मृत्यूनंतर देहदान करण्याचा संकल्प करून समाजात एक वेगळा संदेश दिला आहे.
प्रा. वले यांनी आपल्या जीवनाचा एक नवा अध्याय उघडत मेल्यानंतरही इतरांना मदत करता येते, अशा विचारातून हा संकल्प केला. त्यांनी केलेल्या या निर्णयाचे शिक्षक, विद्यार्थी, सामाजिक संस्था तसेच विविध स्तरांतून मोठ्या प्रमाणावर कौतुक होत आहे.

“जगता-जगता आपण कित्येकांना मदत करतो; पण मेल्यानंतरही दुसऱ्यांच्या जीवनात आशेचा किरण देणे हे खरं मानवतेचं कार्य आहे,” असे प्रा. वले यांनी या निर्णयामागील भावनिक कारण स्पष्ट करताना सांगितले. वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी व संशोधनासाठी अशा देहदानाचा मोठा उपयोग होतो. त्यामुळे या निर्णयामुळे वैद्यकीय क्षेत्रालाही मोलाचे योगदान मिळणार आहे.
एम. एम. महाविद्यालयातील विद्यार्थी व सहकारी प्राध्यापकांनी प्रा. वले यांच्या निर्णयाचे स्वागत करत, “त्यांचा हा विचार सर्व समाजासाठी प्रेरणादायी असून खऱ्या अर्थाने देणगीचे महत्त्व अधोरेखित करणारा आहे,” अशा भावना व्यक्त केल्या.
समाजात देहदानासारख्या संकल्पाबाबत अजूनही जागरूकतेचा अभाव दिसतो. अशा वेळी प्रा. वासुदेव वले यांसारख्या शिक्षणतज्ज्ञांनी पुढाकार घेऊन दिलेला हा आदर्श नक्कीच प्रेरणादायी आहे. त्यांच्या या स्तुत्य निर्णयामुळे ‘मेल्यानंतरही दुसऱ्यासाठी जगता येते’ हा संदेश अधिक व्यापकपणे पोहोचेल, अशी प्रतिक्रिया सर्वस्तरातून उमटत आहे.
इतर महत्वाच्या बातम्या…
💥 ब्रेकिंग : खडसेंचा जावई प्रांजल खेवलकरला अखेर जामीन मंजूर, कोर्टात नेमकं काय घडलं…
🚍पाचोरा ते तुळजापूर थेट एस.टी. बससेवा सुरू, भाविकांची दीर्घकाळची मागणी पूर्ण