सावखेडा बुद्रुक येथे “एक गाव एक देवी”, ३१ वर्षांची परंपरा कायम

हॅलो जनता न्यूज, सावखेडा ता रावेर- सावखेडा बुद्रुक येथे जय भवानी मित्र मंडळ १९९५ पासून नवरात्र उत्सव मोठ्या उत्साहात आणि भक्तिभावाने साजरा करत आहे. या उत्सवाचे खास वैशिष्ट्य म्हणजे संपूर्ण गावात फक्त एकच सप्तशृंगी देवीची स्थापना केली जाते. त्यामुळे “एक गाव, एक देवी” या उपक्रमातून गावातील ऐक्य, भक्तिभाव आणि परंपरा यांचे दर्शन घडते.
गेल्या ३१ वर्षांपासून अविरत परंपरा जोपासत जय भवानी मित्र मंडळाने सावखेडा बुद्रुक येथील कुंभार वाड्यात सप्तशृंगी देवीची स्थापना केली आहे. नऊ दिवस संपूर्ण गावातील ग्रामस्थ व भाविक एकत्र येऊन देवीची पूजाअर्चा, सकाळ-संध्याकाळ आरती व नवसपूर्ती विधी मोठ्या श्रद्धाभावाने पार पाडतात.
या उत्सवाच्या काळात गावात एक वेगळे नवचैतन्याचे वातावरण अनुभवायला मिळते. धार्मिक विधींबरोबरच मंडळाच्या वतीने विविध सांस्कृतिक, धार्मिक तसेच जनजागृतीपर कार्यक्रम आयोजित केले जातात. त्यामुळे हा उत्सव केवळ भक्तीपुरता मर्यादित राहत नाही, तर सामाजिक बांधिलकी जपणारा ठरतो.
सावखेडा गावात यावर्षी विशेष आकर्षण
यावर्षी उत्सवाचे आणखी एक विशेष आकर्षण म्हणजे अखंड पायी ज्योत यात्रा. दिनांक १९ ते २२ सप्टेंबरदरम्यान वणी गड येथून सावखेडापर्यंत ही यात्रा आयोजित करण्यात आली होती. सुमारे ५० ते ५५ युवकांनी पायी चालत ज्योत सावखेडा येथे पोहोचवली. मंडळाने सांगितल्याप्रमाणे, ही पायी ज्योत यात्रेची परंपरा यापुढेही कायम ठेवण्यात येणार आहे.
संपूर्ण गावातून एकच देवीची स्थापना झाल्यामुळे सकाळ-संध्याकाळ सर्व ग्रामस्थ आरतीला एकत्र जमून भक्तीमय वातावरण निर्माण करतात. या सोहळ्याला सावखेडा बुद्रुक तसेच सावखेडा खुर्द येथील नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला असून, ग्रामस्थांच्या अनमोल सहकार्यामुळे उत्सव अधिक भव्य आणि यशस्वी होत आहे. जय भवानी मित्र मंडळाचा नवरात्र उत्सव हा केवळ धार्मिक कार्यक्रम नसून, गावातील एकात्मता, श्रद्धा आणि परंपरेचा सुंदर संगम असल्याचे सर्वांनी नमूद केले.
इतर महत्वाच्या बातम्या…
🚨 ब्रेकिंग : मत चोरीविरोधात जळगावात काँग्रेसच्या स्वाक्षरी अभियानाला सुरूवात
🚨 ब्रेकिंग : अतिवृष्टी व पूरग्रस्त शेतकऱ्यांना आर्थिक मदत जाहीर, कोणत्या जिल्ह्याला किती निधी पहा….
🛑 ब्रेकिंग : पाचोरा नगरपालिकेची अतिक्रमण हटाव मोहीम : मुख्याधिकारी मंगेश देवरे उतरले रस्त्यावर