ब्रेकिंग : शेतकरी मरतोय अन् मुख्यमंत्र्यांच्या शयनकक्ष दुरुस्तीसाठी तब्बल २० लाख खर्च, खा. अमोल कोल्हे यांची टीका

हॅलो जनता न्यूज, मुंबई – महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निवासस्थान ‘वर्षा’ येथील शयनकक्ष दुरुस्तीसाठी तब्बल ₹२० लाखांचा खर्च करण्यात आल्याची माहिती सार्वजनिक बांधकाम विभागाच्या (PWD) अंदाजपत्रकातून समोर आली आहे. यावरून राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) पक्षाचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी सरकारवर तीव्र टीका केली आहे.
“शेतकऱ्यांसाठी वेगळे निकष, मुख्यमंत्र्यांसाठी वेगळा ऐषआराम”
अमोल कोल्हे यांनी पत्रकार परिषद घेऊन या खर्चासंबंधीचे अंदाजपत्रक दाखवले. ते म्हणाले,
“एकीकडे मुख्यमंत्री छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन करणारे बॅनर लावतात. महाराजांनी शेतकऱ्यांच्या भाजीच्या देठालाही हात लावू नका, असे शिकवले होते. मात्र दुसरीकडे मुख्यमंत्र्यांच्या बेडरूमच्या दुरुस्तीसाठी २० लाख रुपये खर्च करणे योग्य ठरते का?”
त्यांनी पुढे सांगितले की, महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टीमुळे प्रचंड नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांची पिके, घरे आणि जनावरे वाहून गेली आहेत. “त्या भागात तातडीने मदत पोहोचविण्याऐवजी पंचनामे, अहवाल आणि कागदोपत्री सोपस्कार करून शेतकऱ्यांना विलंब लावला जात आहे,” अशी टीका त्यांनी केली.
मदतीच्या प्रतीक्षेत शेतकरी
गेल्या काही दिवसांत जळगाव, नाशिक, छत्रपती संभाजी नगरसह राज्यातील अनेक जिल्ह्यांत मुसळधार पावसाने धुमाकूळ घातला आहे. हजारो हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले असून, शेतकरी मदतीच्या प्रतीक्षेत आहेत. अशा परिस्थितीत मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी ऐषआरामी खर्च होत असल्याची बातमी समोर येताच राजकीय वर्तुळात मोठी चर्चा सुरू झाली आहे.
विरोधकांकडून सरकारवर “शेतकरी व सामान्य जनता यांना दिलासा न देता स्वतःच्या ऐषआरामी खर्चावर लाखो रुपये उडवले जात आहेत,” अशा शब्दांत हल्लाबोल सुरू झाला आहे. आगामी अधिवेशनात या विषयावर जोरदार राजकीय वादंग होण्याची शक्यता आहे.
इतर महत्वाच्या बातम्या…
💥 ब्रेकिंग : खडसेंचा जावई प्रांजल खेवलकरला अखेर जामीन मंजूर, कोर्टात नेमकं काय घडलं…
🚍पाचोरा ते तुळजापूर थेट एस.टी. बससेवा सुरू, भाविकांची दीर्घकाळची मागणी पूर्ण
सावखेडा बुद्रुक येथे “एक गाव एक देवी”, ३१ वर्षांची परंपरा कायम