दोन मुलांना वाचवताना युवक व महिलेचा बुडून मृत्यू; भडगाव शहरात शोककळा.

भडगाव प्रतिनिधी : यशकुमार पाटील
मिळालेल्या माहितीनुसार, गिरणा नदी पात्रातील डोहाजवळ दोन लहान मुले पाण्याच्या कडेला खेळत असताना अचानक त्यांचा पाय घसरून ती पाण्यात पडली. त्यावेळी जवळच भांडी धुण्यासाठी आलेल्या काफिया शरीफ पिंजारी (वय १६) यांनी हे दृश्य पाहताच मुलांना वाचवण्यासाठी तत्काळ पाण्यात उडी घेतली. मात्र पाण्याची खोली जास्त असल्याने त्या स्वतःच बुडू लागल्या.
ही घटना पाहून तेथील रहिवासी नदीम खान नसीम खान (वय २७) यांनीही तत्काळ पाण्यात उडी मारून मदतीचा प्रयत्न केला. त्यांनी दोन्ही लहान मुलांना वाचवण्यात यश मिळवले; परंतु नदीपात्रातील खोल गड्यांमध्ये असलेल्या भौरीच्या पाण्यात अडकून काफिया पिंजारी व नदीम खान यांना बाहेर येता आले नाही. दुर्दैवाने या दोघांचा बुडून मृत्यू झाला.
घटनेची माहिती मिळताच प्रशासनाने तत्काळ घटनास्थळी धाव घेत मदतकार्य सुरू केले. स्व. बापूजी युवा फाउंडेशनची रुग्णवाहिका घटनास्थळी दाखल झाली. तसेच भडगाव शहर तलाठी अविनाश जंजाळे, टोणगाव तलाठी प्रशांत कुंभारे, रितेश महाजन, पोलीस निरीक्षक महेश शर्मा यांच्यासह पोलीस कर्मचारी, नगरपरिषदेचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले.
दरम्यान भडगाव-पाचोरा मतदारसंघाचे आमदार किशोर पाटील, नगराध्यक्षा रेखा मालचे, नगरसेवक तसेच मोठ्या संख्येने नागरिक व मृतांचे नातेवाईक घटनास्थळी उपस्थित होते. दोन्ही मृतदेह भडगाव ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आले. तेथे डॉ. पंकज जाधव यांनी तपासणी करून मृत घोषित केले. त्यानंतर शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले.
दोन निष्पाप जीव वाचवण्याच्या प्रयत्नात युवक व महिलेचा मृत्यू झाल्याने संपूर्ण भडगाव शहरात हळहळ व्यक्त होत असून परिसरात दुःखाचे वातावरण पसरले आहे.



