Medicine : बनावट औषधी खरेदी-विक्रीचे मोठे रॅकेट राज्यात सक्रिय, मंत्र्यांनी दिली धक्कादायक माहिती
हॅलो जनता, मुंबई – बनावट औषधी (Medicine) खरेदी-विक्री करण्यात एक मोठे रॅकेट गुंतले असून, त्याचा बीमोड करण्यासाठी शासन प्रयत्नशील आहे. तेलंगणा ते गुजरात आणि तेथून महाराष्ट्र अशी ही मोठी लिंक असून, त्याचा तपास सुरू असल्याचे अन्न व औषधी प्रशासनमंत्री धर्मरावबाबा आत्राम यांनी विधान परिषदेत सांगितले.
आत्राम यांनी प्रश्नोत्तराच्या तासात सांगितले की, अन्न व औषधी (Medicine) प्रशासनाकडून एप्रिल ते ऑक्टोबर २०२३ मध्ये २.८५ कोटी रुपयांची बनावट औषधी जप्त केली. तेलंगणा येथील मे. हेट्रो हेल्थकेअर या उत्पादकाच्या बनावट इंजेक्शनच्या साठ्याची विक्री बाजारात होत असल्याची माहिती मिळाल्यानंतर अन्न व औषधी प्रशासनाने त्याचा शोध घेतला. त्यावेळी चेंबूरच्या लाइफ क्युरा फार्मा यांच्याकडे सदर औषधींच्या तीन व्हाइल्स सापडल्या. त्यापैकी दोन व्हाइल्स औषधी नियंत्रण प्रयोगशाळेकडे चाचणीसाठी पाठविण्यात आल्या. एका व्हाइल्सची तुलना उत्पादनाच्या वेळी ठेवण्यात आलेल्या कंट्रोल सॅम्पलसोबत केली असता लाइफ क्युरा फार्मा यांच्याकडील औषधी बनावट असल्याचे आढळून आले. याप्रकरणी संबंधितांविरुद्ध गोवंडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे, तसेच बनावट औषधी खरेदी- विक्री करणाऱ्या के. डेक्कन हेल्थकेअर या दुकानाचे परवाने रद्द करण्यात आले आहेत.
बनावट इंजेक्शन आढळलेल्या त्या कंपनीविरोधात मनुष्यवधाचा गुन्हा लावण्याबाबत इतर सर्व संदर्भ तपासून पाहण्यात येत आहेत, असेही आत्राम यांनी सांगितले. याप्रकरणी उमा खापरे, चंदशेखर बावनकुळे, भाई गिरकर, रमेशदादा पाटील, प्रसाद लाड आदींनी प्रश्न विचारला होता.
जळगाव जिल्ह्यासाठी महत्वाची बातमी, पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या पाठपुराव्याला यश..