Shivsena : शिंदेंना विधानसभेच्या आधी मोठा धक्का बसण्याची शक्यता, इतके आमदार ठाकरेंच्या संपर्कात..
हॅलो जनता (मुंबई ) – लोकसभा निवडणुकीचा निकाल जाहीर झाल्यानतंर भाजपमध्ये संघटनात्मक बदलांची चिन्ह दिसू लागलेली असतानाच आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनाही धक्का बसण्याची शक्यता आहे. कारण, ज्या शिवसेनेतून वेगळं होत एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेच्या (shivsena) शिंदे गटाला उदयास आणलं आणि धनुष्यबाण हे पक्षाचं चिन्हंही मिळवलं त्याच शिंदे गटाचे 5 ते 6 आमदार ठाकरे गटाच्या संपर्कात असल्याचं म्हटलं जात आहे.
लोकसभा निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर ठाकरेंच्या शिवसेनेला (shivsena) चांगलं यश मिळाल्यानंतर काही राजकीय समीकरणं बदलणार असल्याच्या चर्चांनी जोर धरला होता. ज्यानंतर हे वृत्त समोर आल्यामुळं या चर्चांना आणखी वाव मिळाला आहे. मविआच्या बाजूनं राज्यातील जनतेनं कौल देत महायुतीला हा मोठा धक्का ठरल्यानं शिंदे गटातील काही आमदार ठाकरे गटाकडे परतणार असल्याचं जोरदार चर्चा सुरू आहे.
सूत्रांच्या माहितीनुसार ठाकरे गटाच्या संपर्कात असणाऱ्या त्या आमदारांचा लवकरच पक्षप्रवेशही होणार असल्याचं सांगितलं जात आहे. या माहितीमुळं राजकीय वर्तुळात आता अनेक चर्चांना उधाण आलं असून, नव्या समीकरणांनी डोकं वर काढल्याचं पाहायला मिळत आहे.
लोकसभा निवडणुकी दरम्यान आणि लोकसभा निवडणूक निकालानंतर शिवसेना शिंदे गटाच्या सहा आमदारांनी उद्धव ठाकरे यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे. पक्ष फुटीनंतर ज्या आमदारांनी शिवसेना ठाकरे गटावर टोकाचा विरोध करणं टाळलं किंवा ठाकरेंच्या विरोधात कुठल्याही प्रतिक्रिया न देता शिवसेना शिंदे गटात राहूनसुद्धा तटस्थ भूमिका ठेवली, अशा आमदारांचा ठाकरे गटात प्रवेश होण्याची शक्यता असल्याचं बोललं जात आहे.
Shivsena : ज्या आमदारांनी तटस्थ भूमिका घेतली, त्यांचाच विचार ठाकरे गटाकडून केला जाणार …
आतापर्यंत एकूण सहा आमदारांनी उद्धव ठाकरे यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. शिवसेना ठाकरे गटात घेत असताना ज्या आमदारांनी तटस्थ भूमिका घेतली, त्यांचाच विचार ठाकरे गटाकडून केला जाणार असल्याची माहिती समोर येत आहे. तसेच, मुंबई आणि पश्चिम महाराष्ट्रातील शिंदेंच्या शिवसेनेचे (shivsena) खासदार प्रामुख्यानं ठाकरेंच्या संपर्कात असल्याची माहिती मिळत आहे.