हॅलो सामाजिक⁠हॅलो क्राईम

मांडकी परिसरातून अवैध वाळू उपसा करणारी बोट जप्त.

हॅलो जनता प्रतिनिधी 

महसूल विभागाची मध्यरात्री धडक कारवाई ; वाळू माफियांमध्ये खळबळ

भडगाव : तालुक्यातील मांडकी परिसरातील नदीपात्रातून सुरू असलेल्या अवैध वाळू उपशावर महसूल विभागाने मोठी कारवाई करत एक संशयित बोट जप्त केली. तहसीलदार शितल सोलट यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली असून, या घटनेमुळे वाळू माफियांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मांडकी परिसरातील नदीपात्रात काही दिवसांपासून मोठ्या प्रमाणावर अवैध वाळू उपसा सुरू असल्याची माहिती महसूल प्रशासनाला मिळाली होती. त्यानुसार महसूल विभागाने १० मे रोजी रात्री उशिरा छापा टाकत नदीकिनारी उभी असलेली मोठी बोट ताब्यात घेतली. हि बोट १० ते १५ फूट लांब असून ती सोनालिका कंपनीच्या ७४५ ट्रॅक्टरला जोडलेली आहे.तसेच या बोटीला शक्तिशाली इंजिनसह व्हक्युम पाइप व मोठ्या आकाराचे पाईप जोडण्यात आले होते. विशेष म्हणजे बोटीवर काही धार्मिक व ऐतिहासिक व्यक्तींची पदवी लिहिलेली असल्याचीही चर्चा परिसरात रंगली आहे. हे पाहण्यासाठी तहसील कार्यालयाच्या आवारात नागरिक मोठी गर्दी करत आहेत.

कारवाईदरम्यान या पथकात तहसीलदार शीतल सोलट, महसूल सहाय्यक महादू कोळी, तलाठी योगेश पाटील, प्रसाद दुदुसकर, निखिल बावस्कर यांच्यासह पोलीस कर्मचाऱ्यांनीही सहभाग होता. जप्त करण्यात आलेली बोट तहसील कार्यालय परिसरात आणण्यात आली असून, संबंधित चालक व मालकाविरुद्ध कठोर कारवाईची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.

दरम्यान, ही बोट नेमकी कोणाची आहे, अवैध वाळू उपसा किती दिवसांपासून सुरू होता, तसेच या रॅकेटमध्ये आणखी कोणाचा सहभाग आहे का, याबाबत प्रशासनाकडून तपास सुरू करण्यात आला आहे. या कारवाईमुळे तालुक्यातील अवैध वाळू व्यवसायाला मोठा धक्का बसल्याचे बोलले जात असून या कारवाईमुळे तालुक्यातील वाळू चोरांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, प्रशासन आता आणखी कोणत्या ठिकाणी रडार टाकणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

 

वरिष्ठांच्या मार्गदर्शनानुसार कठोर कारवाई करु

मांडकी परिसरात रात्री ही कारवाई करण्यात आली. विना क्रमांकाचा ट्रॅक्टर आणि बोट जप्त केली असून, ती नदीपात्रात उतरण्याच्या तयारीत असतानाच पकडली. यापूर्वीही ३ महिन्यांपूर्वी अशीच एक बोट नष्ट करण्यात आली होती. आताच्या कारवाईबाबत वरिष्ठांकडून मार्गदर्शन मागवण्यात येत असून, त्यानुसार चालक आणि मालकावर कठोर कायदेशीर कारवाई केली जाईल.

~ शितल सोलाट, तहसीलदार भडगाव

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button