भडगाव ग्रामीण रुग्णालयाची दयनीय अवस्था, चक्क ऑपरेशन थिएटरमध्ये पाणी गळती

हॅलो जनता, भडगाव प्रतिनिधी – “रुग्णांसाठी उभं केलेलं रुग्णालय, आज स्वतः बनलंय रुग्ण” ही वाक्यं भडगावच्या ग्रामीण रुग्णालयावर अक्षरशः लागू पडत आहे. गोरगरीब जनतेसाठी आशेचा किरण असलेल्या या रुग्णालयाची सध्या झालेली दुरवस्था पाहता प्रशासनाच्या हलगर्जीपणाचे चित्र स्पष्टपणे समोर येत आहे. सध्या सोशल मीडियावर आणि स्थानिक वृत्तमाध्यमांतून एक धक्कादायक दृश्य समोर आलं आहे. भडगाव ग्रामीण रुग्णालयाच्या ऑपरेशन थिएटरमधून थेट पाणी गळतंय! छतामधून येणारे पाणी थेट ऑपरेशन थिएटरमधील उपकरणांवर आणि उपचार सुरू असलेल्या जागेवर पडत असल्याचे स्पष्ट दिसत आहे. अशा परिस्थितीत जर शस्त्रक्रिया झाल्यास रुग्णाच्या जीवाला धोका निर्माण होऊ शकतो.
भडगाव ग्रामीण रुग्णालयातील अन्य समस्याही गंभीर
ही समस्या केवळ एका खोलीपुरती मर्यादित नाही. संपूर्ण रुग्णालयात पाण्याच्या गळतीमुळे भिंतींवर ओलसरपणा, फुगलेल्या भिंती, गंजलेली खिडक्या-दारे, स्वच्छतेचा अभाव आणि अर्धवट कामांमुळे निर्माण झालेली अस्ताव्यस्तता दिसून येते. आरोग्यसेवेच्या नावाखाली चालणाऱ्या या इमारतीत रुग्णांपेक्षा अधिक ‘आजारी’ स्थिती ही आहे. या परिस्थितीमुळे रुग्णालयात उपचारासाठी येणाऱ्या गोरगरीब रुग्णांना मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागत आहे. आरोग्य कर्मचाऱ्यांनाही काम करताना अत्यंत अपारंपरिक आणि त्रासदायक अडचणींचा सामना करावा लागत आहे. अनेकदा औषध साठवण्यासाठी योग्य खोली उपलब्ध नसणे, गळतीमुळे औषधं खराब होणे अशा घटना घडत आहेत.
भडगाव ग्रामीण रुग्णालयाकडे सार्वजनिक बांधकाम विभागाची डोळेझाक?
या रुग्णालयाची देखभाल व दुरुस्तीची जबाबदारी सार्वजनिक बांधकाम विभागावर आहे. मात्र आजवर या विभागाने याकडे सातत्याने दुर्लक्ष केल्याचे स्थानिक नागरिकांचे म्हणणे आहे. अनेक वेळा तक्रारी करूनही कोणतीही कार्यवाही न झाल्याने नागरिकांमध्ये संताप पसरला आहे. त्वरित दुरुस्ती करून रुग्णालयाची सुसज्जता वाढवावी, ऑपरेशन थिएटरची परिस्थिती पाहता तत्काळ कारवाई करावी, संबंधित अधिकाऱ्यांवर जबाबदारी निश्चित करावी, दीर्घकालीन उपाययोजना राबवून आरोग्य सेवांमध्ये सुधारणा करावी अशी मागणी स्थानिक नागरिकांनी केली आहे.
इतर महत्वाच्या बातम्या…
सामाजिक कार्यकर्ते सचिन धांडे यांची महाराष्ट्र राज्य अन्न आयोगावर नियुक्ती
MPSC च्या कारभारावर प्रश्न चिन्ह, अधिकारीपदी निवड झाली, पण २२ जणांना पत्रच नाही
💥धक्कादायक : पुन्हा रेल्वे खाली दांपत्याची आत्महत्या, कारण अस्पष्ट….