Bacchu Kadu : आ. बच्चू कडू गाजवणार रावेरचे मैदान, सत्ताधारी-विरोधकांवर करणार टीका
प्रहारचे उमेदवार अनिल चौधरी यांच्या प्रचारार्थ आज रावेर, फैजपूरला सभा
हॅलो जनता, यावल/रावेर : प्रहार जनशक्ती पक्षाचे प्रमुख माजी मंत्री आ. बच्चू कडू (Bacchu Kadu) आज रावेर, फैजपूरचे मैदान गाजवायला येत आहेत. रावेर-यावल विधानसभा मतदारसंघातील परिवर्तन महाशक्ती प्रहार जनशक्ती पक्षाचे अधिकृत उमेदवार अनिल छबिलदास चौधरी यांच्या प्रचारार्थ आ.बच्चू कडू यांच्या २ जाहीर सभा होणार असून त्यात ते कोणावर टीका करणार याकडे लक्ष लागून आहे.
रावेर-यावल विधानसभा मतदारसंघातील परिवर्तन महाशक्ती प्रहार जनशक्ती पक्षाचे अधिकृत उमेदवार अनिल छबिलदास चौधरी यांच्या प्रचाराचा जोरदार धडका ग्रामीण भागात सुरू आहे. यावल, फैजपूर, रावेर तालुक्यात मतदारांचा जोरदार प्रतिसाद लाभत असून अनिल चौधरींचा विजय निश्चित असल्याचे म्हटले जात आहे.
अनिल चौधरी यांच्या प्रचारासाठी प्रहार जनशक्ती पक्षाचे नेते आ.बच्चू कडू (Bacchu Kadu) यांची तोफ आज मतदारसंघात धडकणार आहेत. आपल्या रोखठोक भाषणाने दिग्गजांना घाम फोडणारे, अधिवेशनात थेट टीका करणारे बच्चू कडू (Bacchu Kadu) आज कुणाला लक्ष्य करणार याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे. परिवर्तन महाशक्तीच्या माध्यमातून आ.बच्चू कडू हे तिसऱ्या आघाडीत सहभागी झाले असून त्यामुळे ते महायुती आणि महाविकास आघाडीवर जोरदार प्रहार करण्याच्या अंदाज आहे.
रावेर, फैजपूरला भव्य सभा
आ.बच्चू कडू (Bacchu Kadu) यांचे दुपारी हेलिकॉप्टरने रावेर येथे आगमन होणार आहे. दुपारी ४ वाजता छोरिया मार्केट, बुऱ्हाणपूर रोड, रावेर येथे सभेला ते संबोधित करणार असून सायंकाळी ७ वाजता आठवडे बाजार, मरीमाता मंदीराजवळ, फैजपूर येथील सभेला ते संबोधित करणार आहेत. मतदार संघातील नागरिक आणि प्रहार जनशक्ती पक्षाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी या सभेला मोठ्याप्रमाणात उपस्थिती द्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.