विद्यापीठात व्यवस्थापन अध्ययन प्रशाळेतर्फे युवक जनजागृती शिबिराचे आयोजन…

हॅलो जनता न्यूज, जळगाव प्रतिनिधी – कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या व्यवस्थापन अध्ययन प्रशाळेतर्फे युवक जनजागृती शिबिराचे आज दि. १८ सप्टेंबर रोजी आयोजन करण्यात आले. आयोजित शिबिरात विविध मान्यवर प्राध्यापकांनी युवकांना आरोग्य, नातेसंबंध, समाजभान आणि जबाबदारी याबाबत मार्गदर्शन केले.
शिबिराची सुरुवात डॉ. शमा सराफ यांच्या “युवक जनजागृती” या विषयावरील सत्राने झाली. त्यांनी आजच्या युवकांनी सामाजिक जाणिवा जोपासून समाजासाठी कर्तव्यभावनेने वागावे, यावर विशेष भर देत मार्गदर्शन केले. यानंतर डॉ. सुमन लोढा यांनी ॲनिमिया व हिमोग्लोबिनचे महत्त्व या विषयावर सविस्तर मार्गदर्शन केले. रक्तातील हिमोग्लोबिनची कमतरता कशी टाळता येईल आणि त्याचे आरोग्यावर होणारे परिणाम याबाबत त्यांनी विद्यार्थ्यांना जागृत केले.
डॉ. जयश्री महाजन यांनी युवकांमधील नातेसंबंध व हार्मोनल असंतुलन या संवेदनशील विषयावर विद्यार्थ्यांशी थेट संवाद साधला. त्यांनी नातेसंबंधांमध्ये परस्पर विश्वास, आदर आणि भावनिक संतुलन राखण्याचे महत्त्व स्पष्ट केले. तर डॉ. उषा शर्मा यांनी कॅन्सर जनजागृती या विषयावर माहिती देत कॅन्सरचे प्रकार, लक्षणे आणि प्रतिबंधात्मक उपाय याबाबत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. कार्यक्रमाच्या शेवटी डॉ. उज्ज्वला वर्मा यांनी रक्तदान शिबिराचे महत्त्व अधोरेखित केले. त्यांनी रक्तदानाचे फायदे, त्यातून होणारे सामाजिक योगदान यावर भर देत विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष रक्तदानासाठी प्रेरित केले.
या कार्यक्रमात प्रशाळेतील विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. आरोग्यजाणीव, नातेसंबंधातील संवेदनशीलता, समाजभान आणि सामाजिक जबाबदारी याबाबतचे महत्त्वपूर्ण धडे विद्यार्थ्यांना या शिबिरातून मिळाले. डॉ. मधुलिका सोनवणे यांनी सर्व मान्यवरांचे आभार मानत विद्यार्थ्यांनी जागरूक आणि जबाबदार नागरिक म्हणून समाजकार्यात सक्रिय सहभाग घ्यावा, असे आवाहन केले.
इतर महत्वाच्या बातम्या…
🛑चोपडा कृषी उत्पन्न बाजार समितीची ऐतिहासिक कामगिरी, जळगाव जिल्ह्यात प्रथम…