भडगावच्या एरंडोल–पारोळा मार्गावर वाहतूक ठप्प

गिरणा पुलावर ट्रॅक्टर पंक्चर; दोन तास वाहनांची प्रचंड कोंडी
मुख्य रस्त्यातच ट्रॅक्टर अडकून पडल्याने दोन्ही बाजूंनी वाहतूक ठप्प झाली. सुरतळकडे जाणाऱ्या लक्झरी बस, तीन ते चार खासगी बस, अवजड वाहने तसेच शेकडो दुचाकीस्वार रस्त्यावर अडकून पडले. काही दुचाकीस्वारांना वाहतुकीच्या कोंडीतून जीव मुठीत घेऊन मार्ग काढावा लागला.

हा रस्ता एरंडोल, पारोळा व कोळगावकडे जाणारा अत्यंत महत्त्वाचा मार्ग असून पुलावरील मोठे खड्डे व प्रशासनाचे दुर्लक्ष यामुळे वारंवार अपघात व वाहन बिघाडाच्या घटना घडत आहेत. मात्र याकडे संबंधित विभागाकडून साफ दुर्लक्ष होत असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे.
घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन वाहतूक नियंत्रणाचा प्रयत्न केला. तब्बल दोन तासांच्या अथक प्रयत्नांनंतर अडकलेला ट्रॅक्टर बाजूला काढण्यात आला आणि वाहतूक सुरळीत झाली. मात्र तोपर्यंत प्रवासी, विद्यार्थी व वाहनचालकांचा प्रचंड मनस्ताप झाला. यावेळी मुख्य रस्त्यावरील पुलाची दुरुस्ती कधी होणार, असा संतप्त सवाल नागरिकांनी उपस्थित केला.




