गाळणच्या हितेश पहेलवानचा राष्ट्रीय स्तरावर झेंडा, आता उजबेकिस्तानमध्ये भारताचे प्रतिनिधित्व

हॅलो जनता न्यूज, पाचोरा – तालुक्यातील गाळण (खु.) या छोट्याशा गावातील सुपुत्र पहेलवान हितेश अनिल पाटील यांनी आपल्या दमदार कुस्ती कौशल्याच्या जोरावर राष्ट्रीय पातळीवर चमकदार कामगिरी केली आहे. नुकत्याच मिशन ऑलिम्पिक गेम्स असोसिएशन इंडिया यांच्या वतीने बेळगाव (कर्नाटक) येथे पार पडलेल्या राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेत हितेश पाटील यांनी १२५ किलो (ओपन) गटात सुवर्ण पदक मिळवत महाराष्ट्रासह जिल्ह्याचे नाव अभिमानाने उंचावले आहे.
या उल्लेखनीय यशानंतर आता हितेश पाटील यांची भारताच्या संघात निवड झाली असून, येत्या नोव्हेंबर २०२५ मध्ये उजबेकिस्तान येथे होणाऱ्या आंतरराष्ट्रीय कुस्ती स्पर्धेत ते भारताचे प्रतिनिधित्व करणार आहेत. त्यांच्या या यशामुळे गाळण परिसरात आणि पाचोरा तालुक्यात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.
हितेश पहेलवान : महाराष्ट्र केसरी विजेते विजय चौधरी यांच्या शुभेछा…
हितेश यांच्या यशाबद्दल महाराष्ट्र केसरी विजेते विजय चौधरी आणि प्रसिद्ध पहलवान सिकंदर शेख यांनी भेट घेऊन त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन केले आहे तसेच पुढील आंतरराष्ट्रीय स्पर्धेसाठी हार्दिक शुभेच्छा दिल्या आहेत. हितेश पाटील हे पाचोरा पंचायत समितीच्या माजी सभापती ललिता अनिल पाटील आणि अनिल धना पाटील (संचालक, शेतकरी सहकारी संघ पाचोरा व माजी सरपंच, गाळण खु.) यांचे सुपुत्र आहेत. कुटुंबाच्या प्रोत्साहनासोबतच त्यांच्या चिकाटी, मेहनत आणि जिद्दीमुळे त्यांनी ही उल्लेखनीय कामगिरी साध्य केली आहे.
गाळण आणि पंचक्रोशीतील नागरिकांनी हितेश यांच्या यशाबद्दल अभिमान व्यक्त करत त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छांचा वर्षाव केला आहे. आता सर्वांच्या नजरा उजबेकिस्तानमधील होणाऱ्या आंतरराष्ट्रीय स्पर्धेकडे लागल्या आहेत, जिथे हितेश पाटील भारताचा तिरंगा फडकवण्यासाठी सज्ज होत आहेत.
इतर महत्वाच्या बातम्या…
🚨 ब्रेकिंग : भडगाव शहर स्वच्छतेसाठी महिलांचा पुढाकार — डासमुक्त शहरासाठी प्रशासनाला साकडे!
🚨 ब्रेकिंग : एकनाथ खडसेंच्या घरात चोरी, सीडी आणि पेनड्राईव्ह चोरीला
🔴 ब्रेकिंग : जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुका पुन्हा लांबणीवर!




