हॅलो राजकारण
Trending

आरक्षणाच्या विषयावर सर्वपक्षीय बैठकीचे आयोजन, नेमके काय घडले बैठकीत….

हॅलो जनता, प्रतिनिधी – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली आरक्षणाच्या विषयावर सर्वपक्षीय बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. राज्यात मराठा आणि ओबीसी समाजात तेढ निर्माण होऊ नये, पुरोगामी महाराष्ट्राची परंपरा अबाधित राखतानाच राज्य शासन कुठल्याही समाज घटकावर अन्याय होवू देणार नाही, अशी ग्वाही देऊन आरक्षणाबाबत राजकीय पक्षांनी आपली लेखी भूमिका, अभिप्राय शासनाला कळवावेत, असे आवाहन मुख्यमंत्र्यांनी यावेळी केले.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ, मंत्री सर्वश्री चंद्रकांत पाटील, राधाकृष्ण विखेपाटील, छगन भुजबळ, रवींद्र चव्हाण, शंभूराज देसाई, दादाजी भुसे, अतुल सावे, धनंजय मुंडे यांच्यासह खासदार अशोक चव्हाण, सुनील तटकरे, ज्येष्ठ नेते प्रकाश आंबेडकर, आमदार सर्वश्री प्रवीण दरेकर, गोपीचंद पडळकर, बच्चू कडू, भरत गोगावले, महादेव जानकर आदी मान्यवर उपस्थित होते.

आरक्षणासंदर्भात विविध राजकीय पक्ष, संघटनांची भूमिका महत्वपूर्ण असून राज्यात मराठा, ओबीसी समाजाच्या आरक्षणाबाबत चर्चेतून मार्ग निघाला पाहिजे. कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राखली जातानाच जातीय सलोखा देखील कायम राहिला पाहिजे अशी भूमिका मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी यावेळी मांडली.

मराठा समाजाला १० टक्के आरक्षण देण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. तो कायद्याच्या चौकटीत टिकण्यासाठी आमचे प्रयत्न आहेत. हा निर्णय घेतल्यापासून शिक्षण, पद भरतीमध्ये मराठा समाजातील उमेदवारांना लाभ झाला आहे. मराठा समाजाला टिकणारे आरक्षण देतानाच अन्य समाज घटकांवर अन्याय होऊ देणार नाही, अशी ग्वाहीही मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिली. गॅझेटच्या तपासणीसाठी हैदराबाद येथे ११ जणांची टीम पाठविण्यात आल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

आरक्षण हा राजकारणाचा विषय नाही तर त्यातून सामाजिक सलोखा अबाधित राहावा यासाठी शासनाची प्रामाणिक भूमिका आहे. त्या दिशेने शासनाची सकारात्मक प्रक्रिया सुरू असल्याचे मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी सांगितले. राज्यात सौहार्दपूर्ण वातावरण कायम रहावे, यासाठी सर्वपक्षीय सदस्यांना विश्वासात घेऊन चर्चेतून मार्ग काढण्याबाबत आजची बैठक बोलावण्यात आली होती. मराठा आणि ओबीसी समाजातील कटुता दूर करण्यासाठी आजची बैठक होती. यापूर्वीही १ नोव्हेंबर २०२३ रोजी अशाच प्रकारे सर्वपक्षीय बैठक घेण्यात आली होती, असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

इतर महत्त्वाच्या बातम्या…

Jain Irrigation : जैन इरिगेशनच्या सहकार्यातून १००० झाडांची लागवड

Rohini khadse : गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर रोहिणी खडसे यांनी जाणून घेतल्या मुर्तिकारांच्या समस्या

Aadity Tatkare : ‘मुख्यमंत्री-माझी बहीण लाडकी योजने’चा राज्यात अडीच कोटीहुन अधिक महिलांना लाभ मिळणार

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button