पाचोऱ्यात भरडधान्य ऑनलाईन खरेदी गैरव्यवहाराची शक्यता : व्यापारी तुपाशी तर शेतकरी उपाशी…
हॅलो जनता न्यूज, पाचोरा : आजपासून भरड धान्य खरेदीसाठी ऑनलाईन नोंदणी प्रक्रियेला सुरवात झाली असून या शासकीय ज्वारी व मका खरेदी प्रक्रियेत मोठ्या प्रमाणावर गैरव्यवहार होण्याची शक्यता शेतकऱ्यांकडून व्यक्त करण्यात येत आहे. प्रत्यक्ष नोंदणी सुरू असली तरी व्यापाऱ्यांना नोंदणीसाठी प्राधान्य देण्यात येत असल्याचे बोलले जात आहे. यामुळे खऱ्या शेतकऱ्यांवर अन्याय होण्याची भीती निर्माण झाली आहे. याबाबत स्थानिक शेतकऱ्यांनी प्रशासनाकडे गंभीर तक्रार दाखल केली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, अनेक शेतकरी ज्वारी व मका विक्रीसाठी नोंदणी करत असताना काही जण प्रत्यक्षात पीक न घेता फक्त 7/12 उताऱ्यावर पीक दाखवून शासनाची दिशाभूल करत असल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. यामुळे शासकीय खरेदी प्रक्रियेची पारदर्शकता धोक्यात येत असून, प्रामाणिक शेतकऱ्यांना आर्थिक नुकसान सहन करावे लागू शकते.

भरड धान्य ऑनलाईन नोंदणी: संतप्त शेतकऱ्यांनी प्रशासनाला दिले निवेदन….
शेतकऱ्यांनी प्रशासनाला दिलेल्या निवेदनात स्पष्टपणे नमूद केले आहे की, ज्या शेतकऱ्यांनी खरेदीसाठी नोंदणी केली आहे, त्यांच्या शेतांवर प्रत्यक्षात ज्वारी किंवा मका पिकवलेले आहे का, याची शेत पातळीवर जाऊन तपासणी करण्यात यावी. ही चौकशी महसूल व कृषी विभागाच्या संयुक्त पथकाद्वारे करण्याची मागणी करण्यात आली आहे.
तसेच, चुकीची माहिती देऊन शासनाची फसवणूक करणाऱ्या शेतकऱ्यांवर कठोर कारवाई करावी, त्यांची नोंदणी तात्काळ रद्द करावी, अशीही मागणी करण्यात आली आहे. अन्यथा, संपूर्ण खरेदी प्रक्रियेवर प्रश्नचिन्ह निर्माण होण्याची शक्यता शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे.
दरम्यान, जळगाव जिल्हा प्रशासनाने या गंभीर मुद्द्याकडे तात्काळ लक्ष देऊन योग्य ती कारवाई करावी, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. अन्यथा, प्रामाणिक शेतकऱ्यांमध्ये असंतोष वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही. शेतकऱ्यांच्या या मागणीमुळे आता प्रशासन कोणती भूमिका घेते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
इतर महत्वाच्या बातम्या….
ऐनपूर महाविद्यालयात १२० तासांची कौशल्य विकास कार्यशाळा; विद्यार्थिनींचा उत्स्फूर्त प्रतिसाद



