उमेदवार जोमात अन् कार्यकर्ते कोमात, प्रचार सुरू न झाल्याने कार्यकर्त्यांचा हात तंग
हॅलो जनता (प्रमोद रूले) – जळगाव जिल्ह्यातील जळगाव आणि रावेर या दोन्ही मतदारसंघांची निवडणूक प्रक्रिया सुरू झाली आहे. जळगाव लोकसभा मतदारसंघात भाजपकडून स्मिता वाघ, महाविकास आघाडी कडून करण पवार तर वंचित बहुजन आघाडी कडून प्रफुल्ल लोढा निवडणुकीच्या रिंगणात आहेत. तर रावेर लोकसभा मतदारसंघात देखील तीनही पक्षांचे उमेदवार रिंगणात असून दोन्ही लोकसभा मतदारसंघात तिरंगी लढत पाहायला मिळणार आहे.
मात्र प्रत्यक्ष प्रचाराला अजून काही दिवस बाकी असल्याने उमेदवारांच्या भेटीगाठी सुरू आहेत, त्यांच्यासोबत फिरणाऱ्या कार्यकर्त्यांना मात्र अजूनही कुठलीही आर्थिक मदत मिळत नसल्याने जळगाव जिल्ह्यातील दोन्ही मतदारसंघात सर्व पक्षांचे उमेदवार जोमात असून त्यांच्यासोबत फिरणारे कार्यकर्ते मात्र कोमात असल्याची स्थिती पाहायला मिळत आहे
एका मोठ्या पक्षाच्या कार्यकर्त्यांनी हॅलो जनता शी बोलताना सांगितले की, उमेदवारी जाहीर झाल्यापासून मतदारसंघातील प्रत्येक गावात जाण्याचा प्रयत्न हा उमेदवारांचा आहे तर पक्षश्रेष्ठींकडून रोजच वेगवेगळ्या बैठकांचे आयोजन करण्यात येत आहे. मात्र हे सर्व सुरू असून देखील पक्षाकडून किंवा वरिष्ठ नेत्यांकडून कुठलीही आर्थिक मदत होत नसल्याने सध्या तरी फक्त छोटे-मोठे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या खिशाला कात्री लागत असल्याचे त्यांनी सांगितले आहे. त्यामुळे कधी एकदाचा प्रचार सुरू होतो आणि पक्षाकडून आणि उमेदवाराकडून आर्थिक मदत मिळते याची वाट सध्या कार्यकर्ते पाहत आहे.
वाचा इतरही बातम्या