मुख्याधिकाऱ्यांसह नगरसेवकांनी हातात घेतली झाडू ; जीन परिसरात स्वच्छता अभियानाला वेग.

नगरपालिका जीन परिसरात स्वच्छता अभियान; ‘स्वच्छ शहर, सुंदर शहर’चा संकल्प प्रत्यक्ष कृतीत
हॅलो जनता प्रतिनिधी : गजानन गिरी पाचोरा
पाचोरा : शहर स्वच्छ आणि सुंदर करण्यासाठी केवळ घोषणा न करता पाचोरा नगरपालिका प्रशासनाने प्रत्यक्ष कृतीला सुरुवात केली आहे. नगरपालिका जीन परिसरात आयोजित स्वच्छता अभियानात मुख्याधिकारी मंगेश देवरे यांनी स्वतः रस्त्यावर उतरून स्वच्छता केली. यावेळी उपनगराध्यक्ष किशोर आप्पा बारवकर, आरोग्य निरीक्षक तुषार नकवाल तसेच नगरपालिकेचे नगरसेवक सहभागी झाले.

शहराची स्वच्छता ही केवळ प्रशासनाची जबाबदारी नसून नागरिकांचा सक्रिय सहभागही आवश्यक आहे, या भूमिकेतून हे अभियान राबविण्यात आले. मुख्याधिकारी व लोकप्रतिनिधींनी स्वतः स्वच्छता मोहिमेत सहभाग घेतल्याने नागरिकांमध्येही स्वच्छतेबाबत सकारात्मक संदेश गेला.
‘माझे शहर, माझी जबाबदारी’ या भावनेतून नागरिकांनी आपल्या परिसरात कचरा न टाकता नगरपालिका प्रशासनाच्या स्वच्छता मोहिमेला सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले. शहरातील सार्वजनिक ठिकाणे, रस्ते आणि परिसर नियमितपणे स्वच्छ ठेवण्यासोबतच नागरिकांचा सहभाग वाढविण्यावर नगरपालिका प्रशासनाचा भर राहणार आहे.
स्वच्छता, आरोग्य आणि नागरिकांचा सहभाग या त्रिसूत्रीच्या माध्यमातून पाचोरा शहर अधिक स्वच्छ व सुंदर करण्याचा प्रयत्न सुरू झाला असून, मुख्याधिकारी आणि नगरसेवक स्वतः रस्त्यावर उतरल्याने ‘स्वच्छ पाचोरा’चा संदेश नागरिकांपर्यंत पोहोचला आहे.
‘माझे शहर, माझी जबाबदारी!’स्वच्छ शहरासाठी प्रशासनासोबत
नागरिकांनीही पुढाकार घेणे गरजेचे आहे. कचरा रस्त्यावर न टाकता निर्धारित ठिकाणी टाकावा, सार्वजनिक परिसर स्वच्छ ठेवावा आणि नगरपालिका प्रशासनाच्या स्वच्छता अभियानात सक्रिय सहभाग नोंदवावा, असे आवाहन करण्यात आले आहे.




